LPG Cylinder Price Hike: घरगुती एलपीजी सिलेंडर आजपासून महागणार; जाणून घ्या नवे दर
LPG (Photo Credits: All India Radio News, Facebook)

इंडियन ऑईल च्या (Indian Oil)  माहितीनुसार आज 1 जून 2020 पासून देशभरात घरगुती गॅस (Domestic LPG Gas Cylinder) सिलेंडरच्या किमतीत वाढ केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीची किंमत वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ही नवी दरवाढ मुंबई (Mumbai) ,दिल्ली (Delhi) ,कोलकाता (Kolkata) , चेन्नई (Chennai)  सह देशातील सर्व प्रमुख शहरात लागू होणार आहे. यानुसार आजपासून मुंबई मध्ये प्रति 14.2  किलोच्या गॅस सिलेंडर साठी तब्बल 590.50 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्ली यामध्ये हे भाव 593 रुपये , चेन्नई मध्ये 606.50 तर कोलकाता मध्ये सर्वाधिक म्हणजे 616 रुपये इतके असणार आहेत. महत्वाचे म्हणजे हे नवे दर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PM Ujjwala Yojna) लाभार्थ्यांनी द्यायचे नाहीत कारण लॉकडाउन (Lockdown) अंतर्गत करण्यात आलेल्या घोषणेनुसार 30  जून पर्यंत त्यांना मोफत गॅस पुरवठा केला जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, इंधन विक्रेते दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किंमती एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्क दरावर आणि अमेरिकन डॉलर आणि रुपयाच्या विनिमय दरावर अवलंबून बदलत असतात. यानुसार जून 2020 मध्ये एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमती वाढल्यामुळे दिल्ली बाजारपेठेतील एलपीजीच्या आरएसपी (किरकोळ विक्री किंमत) प्रति सिलिंडरमध्ये 11.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याबाबत रविवारी रात्री उशिरा निवेदन करण्यात आले होते. आजपासून हे वाढीव दर लागू होणार आहेत.

दरम्यान, आजपासून देशात लॉक डाऊनचा पाचवा टप्पा सुरु होत आहे. मात्र या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करून व्यवसाय आणि उद्योग पुन्हा सुरु केले जाणार आहेत. अर्थव्यवस्था पुन्हा सुरु होत असताना गॅस सिलेंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील तीन महिन्यांपासून म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यात आले होते.यानंतर आता जून महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.