File image of the Reserve Bank of India | (Photo Credits: PTI)

आजचा दिवस 1 जुलै म्हणजे बदलांचा दिवस आहे. आजपासून अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. रेल्वेच्या जवळपास 250 हून अधिक गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले असून गॅस कंपन्यांनीही सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांच्या व्यवहारांसाठीच्या फीमध्ये काही बदल केले आहेत. तर दुसरीकडे महिंद्रा आणि मारुतीच्या गाड्यांच्या किंमतीतही बदल झाले आहेत.

आजपासून विनाअनुदानित सिलेंडर जवळपास 100 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ग्राहकांना आजपासून सिलेंडर 737.50 रुपयांऐवजी 637 रुपयांना मिळणार आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने आता अनुदानित सिलेंडरचे दर देखील 449.35 रुपये इतके झाले आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ही माहिती दिली आहे.

हेही वाचा- 1 जुलैपासून 'या' नियमात होणार बदल, नागरिकांनी महिना अखेरपूर्वी राहिलेली कामे पूर्ण करा

तर दुसरीकडे ऑनलाईन व्यवहारात आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे पैशांचे व्यवहार करणे आजपासून मोफत होणार आहे. तसेच एसबीआयने आपल्या गृह कर्जावरील व्याजदर रेपो रेटशी जोडणार आहे. यामुळे रेपो रेटच्या बदलानुसार गृह कर्जाच्या व्याजात वाढ किंवा घट होणार आहे.

त्याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्रा ने आपल्या गाड्यांच्या किंमतीत 36 हजारांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे स्कॉर्पिओ, बोलेरो, एक्सयूव्ही 500 इत्यादी गाड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. मारुती सुझुकीने सेडान कारच्या किंमतीत 12 हजारांपर्यंत वाढ केली आहे.