Lok Sabha Election 2019: व्हीव्हीपॅट यंत्र, APP द्वारा तक्रार, मतदार संख्येत वाढ - पहा लोकसभा निवडणूक 2019 ची '8' वैशिष्ट्य काय?
Lok Sabha Elections (Photo Credit: File Photo)

देशामध्ये आजपासून लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Election 2019) ची धामधूम सुरु झाली आहे. आज निवडणुकीच्या तारखा (Loksabha Election Dates)  जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये देशात यंदा लोकसभा निवडणूक 7 टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक चार टप्प्यांमध्ये होणार आहे. 11,18,23 आणि 29 एप्रिल यादिवशी महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार आहे. तर देशभरातील निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 दिवशी लागणार आहे. ही निवडणूक देशातील 17 वी लोकसभा स्थापना करणार आहे. त्यामुळे यंदा मतदारांना त्यांचा अधिकार अधिक सुलभतेने वापरता यावा करिता काही खास योजना केल्या आहेत.

काय असतील यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्य?

  • विरोधकांनी ईव्हीएम  (EVM) मशीनला केलेला विरोध पाहता यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवाराचा फोटोदेखील दिसणार आहे. त्यासाठी 17.04 लाख नवी यंत्र वापरण्यात येणार आहेत.
  • यंदा सुमारे 90 लाख मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकणार आहे. देशात आणि महाराष्ट्रातही मतदान यादीमध्ये मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे. महिलांचे प्रमाणही वाढल्याची माहिती देण्यात आली आहे.
  • मतदार यादीमध्ये नाव शोधण्यासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
  • आचारसंहितेचा भंग झाल्यास यंदा कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी आता नागरिक थेट Appद्वारा तक्रार नोंदवू शकणार आहेत. तसेच तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक आयोग 100 मिनिटांच्या आतमध्ये त्याची दखल घेणार आहे.
  • यंदा मतदार केंद्रावर सीसीटीव्हीच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहेत. संवेदनशील मतदार केंद्रावर शूटिंग केलं जाणार आहे.
  • राज्यात मतदार केंद्रावर पाणी, वीज, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, रॅम्प यांची सोय ठेवली जाणार आहे.
  • राज्यामध्ये सहा लाख कर्मचारी आणि पोलीस निवडणुकीच्या काळात काम करणार आहेत.
  • दिव्यांग मतदारांना घर ते मतदान केंद्र यादरम्यान विशेष सोय पुरवली जाणार आहे.

सध्या देशात एनडीएची सत्ता आहे. भाजपाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. पुन्हा सत्ता स्थापनेसाठी एनडीएसह इतर राजकीय पक्षांमध्ये चुरस रंगणार आहे. महाराष्ट्रामध्ये शिवसेना- भाजपाची युती असून काँग्रेस, एनसीपी सह इतर स्थानिक पक्षांसोबत महाआघाडी बनवण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रचारादरम्यान मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.