Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिलपासून मतदान सुरू होणार आहे. 4 जूनला निकाल लागणार आहे. मात्र उमेदवारांना 4 जूनची वाट पहायची नाही. त्यामुळे ते त्यांचे भविष्य जाणून घेण्यास उत्सुक आहेत. असेच एक प्रकरण तामिळनाडूतून (Tamil Nadu) समोर आले आहे. या ठिकाणी एक पोपट (Parrot) निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचे भविष्य वर्तवत होता, मात्र ही गोष्ट त्याच्या मालकाला फार महागात पडली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या विजयाचा अंदाज बांधणाऱ्या पोपटाच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. कुड्डालोर (Cuddalore) जिल्ह्यात वनविभागाच्या पोलिसांनी पोपट मालक आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले. मात्र, नंतर सूचना देऊन त्यांना सोडून देण्यात आले.
अहवालानुसार, चित्रपट दिग्दर्शक थंगर बचन (Thangar Bachan) कुड्डालोर लोकसभा मतदारसंघातून पट्टाली मक्कल कच्ची पार्टीकडून (Pattali Makkal Katchi) निवडणूक लढवत आहेत. थंगर बचन रविवारी त्यांच्या भागात प्रचार करत होते. यावेळी ते एका मंदिराजवळून गेले. त्याठिकाणी एक ज्योतिषी सेल्वराज मंदिराबाहेर बसला होता. सेल्वराजकडे पिंजऱ्यात एक पोपट होता जो भविष्य वर्तवत होता. त्यावेळी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी थंगर बचन यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला.
संदेष्टा पोपट पिंजऱ्यातून बाहेर आला आणि त्याने एक कार्ड निवडले. ज्यावर त्या मंदिराची मुख्य देवता अझागुमुथु अय्यानार यांचे चित्र होते. पोपटाच्यामते बचन यांना निवडणुकीत यश मिळेल. ज्योतिषाला भेटण्याच्या काही मिनिटांपूर्वीच, बचन यांनी जवळच्या मंदिरात भगवान अय्यानार यांचे आशीर्वाद घेतले होते. पोपटाची भविष्यवाणी पाहून बचन खुश झाले आणि त्यांनी पोपटाला केळी खायला दिली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला.
मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोपटाच्या मालकाला अटक करण्यात आली. याबाबत कुड्डालोर जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी जे रमेश म्हणाले की, वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत पोपटाचे अनुसूची II प्रजातींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे आणि अशा पक्ष्याला बंदिवासात ठेवणे हा गुन्हा आहे. सेल्वराज आणि त्याचा भाऊ श्रीनिवासन यांना पोपट पिंजऱ्यात ठेवल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले. (हेही वाचा: No Future Elections in India: 'पीएम मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास 2024 ची निवडणूक भारताची शेवटची असू शकते'; निर्मला सीतारमण यांचे पती Parakala Prabhakar यांचे मोठे विधान)
दुसरीकडे, पीएमकेचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार अंबुमणी रामदास यांनी पीएमकेचा उमेदवार निवडणूक जिंकेल असे भविष्य सांगणाऱ्या पोपटाच्या मालकाला अटक केल्याबद्दल डीएमके सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘द्रमुक सरकारच्या या मूर्खपणाच्या कृतीतून हे दिसून आले की पीएमकेचा उमेदवार कुड्डालोर लोकसभा मतदारसंघ जिंकेल हे त्यांच्या पचनी पडू शकले नाही. या कृत्याचा निषेध केला पाहिजे. या कारवाईने द्रमुकच्या पराभवाची भीती उघड झाली आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘द्रमुक हा तर्कसंगत पक्ष असल्याचा दावा करतो, मात्र ती एका ज्योतिषाचा अंदाजही सहन करू शकत नाहीत. हा पक्ष किती मूर्खपणा आणि अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे, हेही या कारवाईतून समोर आले.’