Lok Sabha Election 2024: मतदारांसाठी मोफत डोसे, बिअर, ऑटो राइड तसेच बर्गर, विमान तिकिटांवर सवलत; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खास ऑफर्स
Election Voting प्रतिकात्मक प्रतिमा

कर्नाटकसह इतर राज्यांमध्ये येत्या 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या 2 टप्प्यात मतदान होणार आहे. अशात मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी, बंगळुरूमधील (Bengaluru) रेस्टॉरंटसह अनेक आस्थापणा शुक्रवारी लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात वस्तू आणि सेवा देत आहेत. भारत निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अभिनव आणि नाविन्यपूर्ण मतदार जागृती मोहिमा आयोजित केल्या आहेत. यासह आता हॉटेल व्यावसायिक, कंपन्या आणि इतर संस्थांदेखील आपापल्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या प्रयत्नात मतदारांना आकर्षित करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत बेंगळुरूमध्ये केवळ 54% मतदान झाले त्यामुळे यंदा ही टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे.

मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने ब्रुहत बंगलोर हॉटेल्स असोसिएशनला लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्यांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात जेवण देण्याची परवानगी दिली. मात्र या प्रक्रियेत त्यांनी आदर्श आचारसंहिता किंवा इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्यास प्राधिकरणाकडून कायदेशीर कारवाईसाठी ते जबाबदार असतील, या अटीवर असोसिएशनला परवानगी देण्यात आली.

जाणून घ्या ऑफर्स व सवलती- 

मिस्टर फिलीचे नवीन बर्गर आउटलेट 26 एप्रिल रोजी शाईचे बोट दाखवणाऱ्या पहिल्या 100 ग्राहकांना त्यांच्या बर्गर आणि मिल्कशेकच्या खरेदीवर 30 टक्के सूट देत आहे.

लोकप्रिय मनोरंजन पार्क वंडरला हॉलिडेजने बोटांवर शाई लावलेल्या मतदारांसाठी तिकिटांवर 15 टक्के सूट जाहीर केली आहे. ही ऑफर निवडणुकीच्या दिवसापासून 26 एप्रिलपासून तीन दिवसांसाठी लागू असेल.

डेक ऑफ ब्रूज हे मतदानाच्या एका दिवसानंतर, 27 एप्रिल, शनिवारी शाईचे बोट दाखवणाऱ्या पहिल्या 50 ग्राहकांना एक मोफत बिअर देत आहे.

सोशलच्या त्यांच्या सर्व आउटलेटवर मतदान केल्यानंतर बिल दाखवल्यावर जेवणावर 20 टक्के सूट देत आहे. ही ऑफर त्यांच्या संबंधित शहरातील मतदानाच्या तारखेपासून एका आठवड्यासाठी वैध आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस 18-22 वयोगटातील प्रथमच मतदान करणाऱ्यांना त्यांच्या फ्लाइटवर 19 टक्के सूट देत आहे. (हेही वाचा: EVMs and VVPAT Cross-Verification: ईव्हीएमच्या कार्यपद्धीवर अनेक शंका; सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती)

ब्लूस्मार्टद्वारे बेंगळुरू आणि दिल्ली एनसीआरमधील मतदान केंद्रांच्या 30 किमीच्या आत कुठेही प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एकवेळ 50 टक्के सवलत देत आहे. ही ऑफर बेंगळुरू आणि दिल्लीतील संबंधित मतदान तारखांना सकाळी 6 ते संध्याकाळी 7 या वेळेत मतदान केंद्रावर जाण्यासाठी आणि येण्यासाठी ब्लूस्मार्ट राइड्सवर घेता येईल.

बाईक एग्रीगेटर ॲप रॅपिडो (Rapido) ने 26 एप्रिल रोजी बेंगळुरूमधील दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना मोफत ऑटो आणि कॅबचा लाभ देण्यासाठी, ‘SawaariZimmedariKi’ उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ब्रुहत बेंगलुरु महानगर पालिका आणि निवडणूक आयोगासोबत भागीदारी केली आहे. निवडणुकीच्या दिवशी, मतदार 'VOTENOW' कोड वापरून रॅपिडो ॲपवर मोफत राइड्सचा लाभ घेऊ शकतात आणि त्यांचा लोकशाही हक्क बजावू शकतात.

कामत होसरुची आणि अय्यंगार्स ओव्हन फ्रेश सारखी फूड आउटलेट आणि बेकऱ्या मतदारांना निवडणुकीच्या दिवशी 10 टक्के सूट देत आहेत. दुसरीकडे, कॅफे उडुपी रुची सारखी ठिकाणे मोफत मॉकटेल देत आहेत. यासह हॉटेल निसर्ग ग्रँड बटर डोसा, तुपाचे लाडू आणि फळांचा रस देऊ करेल.

'प्रोएक्टिव्ह फॉर हर' या महिला आरोग्य क्लिनिक चेननेही निवडणुकीच्या दिवशी मतदारांसाठी तिच्या सर्व सेवांवर 10% सूट जाहीर केली आहे.