Latest Humanity News: हवाई प्रवासात बाळाला हृदयविकाराचा त्रास, श्वास गुदमरला; विमानातील डॉक्टरांनी वाचवले चिमूकल्याचे प्राण
Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Ranchi Delhi Indigo Flight News: हृदयविकाराचा त्रास असलेल्या एका बाळाचा हवाई प्रवासादरम्यान विमानातच श्वास गुदमरला. ज्यामुळे त्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. मात्र, विमानात असलेल्या दोन डॉक्टरांनी वेळीच केलेल्या प्रथमोबचारामुळे या बाळाचे प्राण वाचले आहेत. रांची ते दिल्ली प्रवासारम्यान ही घटना घडली. बाळाचे वय अवघे सहा महिने होते. विमानाने उड्डाण घेतल्यावर काही वेळातच त्याला श्वसनाशी संबंधित त्रास सुरु झाला. जो नंतर वाढून त्याचा श्वासही कोंडला.

दरम्यान, बाळाला होत असलेला त्रास पाहून विमानातील दोन डॉक्टरांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्याला प्राथमिक उपचार दिले. ज्यामुळे त्याच्या जीवावर बेतलेले निभावले. प्राप्त माहितीनुसार, बाळाचे पालक त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला घेऊन दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) घेऊन जात होते. दरम्यान, टेक ऑफ झाल्यानंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बाळ अस्वस्थ होऊ लागताच पालकांनी क्रू मेंबर्सला माहिती दिली. त्यानंतर विमानात कोणी डॉक्टर असल्यास मदत देण्याबाबत घोषणा करण्यात आली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रांची येथील डॉक्टर डॉ. मोझम्मील फेरोज आणि एक IAS अधिकारी, डॉ. नितीन कुलकर्णी (जे प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर आहेत) तातडीने मुलाच्या मदतीसाठी आले. डॉक्टरांनी विमानामध्ये प्रौढांसाठी असलेलेल्या ऑक्सीजन मास्कचा वापर मुलाला देण्यात आला. तसेच, त्याच्या पालकांकडे असलेल्या वैद्यकीय नोंदी पाहून त्याला आपत्कालीन विभागात असलेली थिओफिलाइन इंजेक्शनसह आणखी काही औषधे देण्यात आली. शिवाय पालकांसोबत डेक्सोना इंजेक्शन होते, ज्यामुळे परिस्थिती हाताळण्यात मदत झाली.

डॉक्टर आणि आयएएस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाची अवस्था पाहून आई रडूत होती. काय करावे तिला समजत नव्हते, अशा वेळी आम्ही मुलावर शक्य तेवढे प्रयत्न करुन उपचार केले. त्यानंतर पुढच्या काहीच वेळात बाळाला आराम मिळाला.