\कोल्हापूर (Kolhapur) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या मुलाने, या व्यक्तीच्या घरातून बंदूक चोरली व त्यानंतर माळरानावर जाऊन 30 हून अधिक राउंड फायर केले. महत्वाचे म्हणजे या मुलाचे वय अवघे 13 वर्षे आहे. हे चोरीचे रिव्हॉल्व्हर चालवण्यासाठी त्याने युट्यूबवरून प्रशिक्षण घेतले होते. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. गोकुळ शिरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त पोलीस उपअधीक्षक महावीर भाऊ सकले हे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराजवळील पसरीचा नगरमध्ये राहत आहेत. त्यांच्या घरातील एका कपाटाच्या उघड्या ड्रॉवरमध्ये जर्मन बनावटीचे .32 बोरचे आर्मिनियस रिव्हॉल्व्हर ठेवण्यात आले होते.
महावीर यांनी सांगितले की रिव्हॉल्व्हरची किंमत 51,400 रुपये होती आणि त्यात जिवंत काडतुसे भरलेली होती. सुरक्षिततेसाठी त्यांनी हे रिव्हॉल्व्हर घरी ठेवले होते. त्यांच्या घरी एक महिला काम करते. कधीकधी तिचा मुलगाही तिच्यासोबत घरी यायचा. एके मुलाने कपाटाच्या ड्रॉवरमधून बंदूक चोरली. पिस्तूल कशी चालवायची हे शिकण्यासाठी त्याने त्याच्या मोबाईलवर अनेक YouTube व्हिडिओ पाहिले. व्हिडिओवरून बंदूक चालवायला शिकल्यानंतर, त्याने शुक्रवारी दुपारी घराच्या भिंतीवर दोन गोळ्या झाडल्या. परंतु लाऊडस्पीकरचा आवाज आणि इतर गोंधळामुळे कोणालाही गोळीबाराचा आवाज ऐकू आला नाही.
भिंतीवर दोन गोळ्या झाडल्यानंतर, त्याला वाटले की तो बंदूक कशी चालवायची हे शिकला. त्यानंतर तो त्याच्या एका मित्राला मन्नेरमाला परिसरातील एका मोकळ्या शेतात घेऊन गेला, जिथे त्याने हवेत आणि आंब्याच्या झाडावर अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर रिव्हॉल्व्हर एका ढिगाऱ्यात फेकून दिली. निवृत्त अधिकारी सकले यांनी रिव्हॉल्व्हर हरवल्याची तक्रार करताच, पोलीस तात्काळ गांधीनगरमधील मोलकरणीच्या घरी पोहोचले. चौकशी केल्यावर कळले की, तिच्या 13 वर्षांच्या मुलाने बंदूक चोरली होती. त्या मुलाने घरातून एक ड्रोनही चोरला होता. (हेही वाचा: Unique protest in Amravati: अमरावतीत शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; विद्यूत खांबावर बसून उपोषण)
अल्पवयीन मुलाने कबूल केले की, तो सोशल मीडिया आणि चित्रपटांमधील व्हिडिओ पाहून बंदूक चालवायला शिकला. या घटनेवर भाष्य करताना पोलीस उपअधीक्षक सुजीतकुमार क्षीरसागर म्हणाले की, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या अशा निष्काळजीपणामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र, सकले यांचा बंदूक परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.