
केरळ मध्ये शाळेतल्या मुलांच्या मारहाणीमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोझिकोड जिल्ह्यात 15 वर्षीय दहावीच्या विद्यार्थाने जीव गमावला आहे. शनिवारी फेअरवेल पार्टी मध्ये झालेल्या वादात पीडीत विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. एलेटिल येथील एमजे उच्च माध्यमिक शाळेतील मुहम्मद शहाबास गुरूवारी थामरासेरी येथील एका खाजगी ट्यूशन सेंटरबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारीत जखमी झाला. त्याला ताबडतोब नजिकच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी 5 विद्यार्थ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पाचही जण दहावीचे विद्यार्थी आहेत.
पाच आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. तसेच पालकांना या विद्यार्थ्यांना पुन्हा बाल न्याय मंडळासमोर हजर करावे असे सांगण्यात आले आहे. सध्या या प्रकरणामध्ये अन्य कोणी प्रौढ व्यक्ती सहभागी होती का? याचा देखील तपास सुरू आहे.
दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होत असल्याने शाळेत निरोप समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात एमजे उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी डान्स सादर केला होता. यावेळी सरकारी वोकेशनल उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांची थट्टा मस्करी केली. ज्याचा बदला घेण्याच्या ईर्ष्येमधून हा प्रकार घडला आहे.
मारहाणीच्या प्रकाराचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शाहबास त्याच्या घरी असताना त्याला त्याचा मित्र या घटनास्थळी घेऊन गेला. जेथे हाणामारीत तो गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला तशाच अवस्थेत घराजवळ सोडून देण्यात आलं. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हाईस मेसेज करत हल्ल्याचा आनंद व्यक्त केल्याचं पोलिस तपासामध्ये दिसून आलं आहे.