राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या एका कथीत स्वयंसेवकाला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक कार्यालय (RSS Office) आणि पोलिस स्थानकात बॉम्ब ठेवणे आणि बॉम्ब टाकून शांतताभंग केल्याच्या आरोपाखाली या स्वयंसेवकाला अटक करण्यात आली आहे. केरळ (Kerala) राज्यातील कन्नूर (Kannur) येथे 16 जानेवारीला ही घटना घडली होती. आरोपीचे नाव प्रबेश असल्याचे समजते. पोलिसांनी आरोपीला तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यातील कोयंबटूर येथून अटक केली आहे. कथीरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएसएस कार्यालय काठिरुर मनोज स्मृती केंद्रम समोर पोलिसांच्या तुकडीवर स्टील बॉम्ब फेकला.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, काठिरुर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक निजेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'प्रबेश याने 16 जानेवारी या दिवशी सकाळी बॉम्ब फेकला. अटक केल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरएसएस कार्यालयावर बॉम्ब फेकण्याचा त्याचा इरादा होता. कन्नूर हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे इथे कोणत्याही कार्यालयावर हल्ला झाला तरी तो विरोधी पक्षानेच केला असे मानले जाते', असे निजेश यांनी सांगितले.
उपनिरीक्षक निजेश यांनी पुढे म्हटले आहे की, 'काही दिवसांपासून इथे पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळावरुन दूर करुन तो या ठिकाणी अशांतता निर्माण करु इच्छित होता. सीसीटीव्ही फुटेजमुळे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन राहू शकतो. या फुटेजच्या आधारेच आम्ही आरोपीची ओळख तत्काळ पटवली. हल्ला केल्यानंतर तो कोयंबटूर येथे गेला होता. मात्र आम्ही तिथेही त्याचा पिच्छा पुरवला. आमच्या पथकाने कोयंबटूर येथून त्याला शोधून काढले'. (हेही वाचा, भारतात दोनच मुलं जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा असणं गरजेचं - सरसंघचालक मोहन भागवत)
पोलिसांनी असेही म्हटले आहे की, आरोपी प्रबेश याच्यावर याआधीही अनेक आरोप आणि गुन्हे पोलीस दप्तरी नोंद आहेत. ज्यात स्फोटक पदार्थ अधिनियम, 1883 अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचाही समावेश आहे. या परिसरातील आरएसएस कार्यालयाला काथिरूर मनोज येथील एका ज्येष्ठ स्वयंसेवकाच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. सांगितले जाते की, 2014 मध्ये या स्वयंसेवकाची सीपीआय (एम) च्या कार्यकर्त्यांनी हत्या केली होती. ज्या स्वयंसेवकाची हत्या करण्यात आली तो स्वयंसेवक काठिरुर मनोज येथील माकप नेता पी जयराजन यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. पी जयराजन यांची 1999 मध्ये हत्या करण्यात आली होती.