Coronavirus: केरळ सरकारचा मोठा निर्णय; जुलै 2021 पर्यंत लागू राहतील कोरोना व्हायरस सुरक्षा मार्गदर्शक तत्वे, असे करणारे देशातील पहिले राज्य
Coronavirus (Photo Credits: PTI)

भारतामध्ये केरळ (Kerala) येथे कोरोना विषाणूचा (Coronavirus) पहिला रुग्ण आढळल होता. त्यानंतर केरळमध्ये वाढत असलेले कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रयत्नाने आटोक्यात आणण्यात आले. आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन सरकारने सतत वाढणार्‍या कोरोनाच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाचा निर्णय घेत, नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. आज, रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, केरळ सरकारने कोविड-19 पासून संरक्षणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे राज्यातील लोकांना एक वर्षासाठी पालन करणे बंधनकारक केले आहे. म्हणजेच, पुढील जुलै 2021 पर्यंत केरळमध्ये कोरोनाचे सुरक्षा नियम लागू राहतील.

एएनआय ट्वीट-

या नियमांमध्ये सार्वजनिक आणि सामाजिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. यासह सामाजिक अंतराचे पालन करणे, रस्त्यावर न थुंकणे अशा सूचना दिल्या आहेत. संपूर्ण वर्षभरात केवळ 50 लोकांना लग्नात सहभागी होण्याची मुभा देण्यात आली असून, अंत्यसंस्कारात केवळ 20 लोक उपस्थित राहू शकतील, असे सांगितले आहे. यासह अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय कोणतेही सामाजिक मेळावे, मिरवणुका किंवा कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकत नाहीत. तसेच, परवानगीनंतरही 10 पेक्षा जास्त लोक अशा समारंभात भाग घेऊ शकणार नाहीत.

असे करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दरम्यान, केरळमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 240 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे एका दिवसात सर्वाधिक आहेत. या नव्या घटनांसह राज्यात एकूण संक्रमणाची संख्या पाच हजाराहून अधिक झाली आहे. आरोग्यमंत्री के. के. सैलजा यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की नवीन रूग्णांपैकी 152 लोक परदेशातून आले आहेत, तर 52 व्यक्ती इतर राज्यातून परत आल्या आहेत. शनिवारी नवीन रुग्णांच्या आकडेवारीसह राज्यात संसर्ग झालेल्यांची संख्या 5204 वर पोहोचली आहे.