Kerala Flight Accident: केरळ येथील विमान अपघातावेळी मदतीसाठी गेलेल्या 26 स्वयंसेवकांना कोरोना विषाणूची लागण 
Air India Express Plane Crash Update (Photo Credits: ANI)

काही दिवसांपूर्वी केरळची (Kerala) राजधानी तिरुअनंतपुरमपासून साधारण 48 कि.मी. अंतरावर असलेल्या कोझिकोड (Kozhikode) येथे एअर-इंडिया एक्सप्रेस (Air-India Express) विमानाचा अपघात झाला होता. आता माहिती मिळत आहे की, या विमान अपघातग्रस्त ठिकाणी मदतीसाठी गेलेल्या 26 स्वयंसेवकांना (Volunteers) कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली. हे स्वयंसेवक जखमींना विमानातून बाहेर काढण्यासाठी 7 ऑगस्टला या ठिकाणी पोहोचले होते. मल्लापुरम जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी सकीना म्हणाल्या की, विमानतळ स्रोतांकडून मला ही बातमी मिळाली आहे की आतापर्यंत बचाव मोहिमेत सामील झालेल्या 26 स्थानिक लोकांना कोविड-19 ची लागण झाली. सध्या सर्वांची काळजी घेतली जात आहे व त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

तत्पूर्वी, जिल्हाधिकारी के गोपाळकृष्णन, पोलिस अधीक्षक यू अब्दुल करीम आणि बचाव मोहीमात सहभागी पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांसह 21 अधिकाऱ्यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते. 7 ऑगस्ट रोजी, दुबईहून 190 प्रवाशांसह आलेल्या एयर इंडिया विमानाचा मलप्पुरम जिल्ह्यातील करिपुर विमानतळावर अपघात झाला होता. धावपट्टीवर हे विमान घसरून दरीत कोसळले होते. या अपघातामध्ये वैमानिकासह 19 लोकांचा मृत्यू झाला होता व 170 हून अधिक लोक जखमी झाले होते.

विमानाचा अपघात झाल्यानंतर अतिवृष्टी आणि कोरोनो व्हायरसची तमा न बाळगला विमानतळ परिसरात राहणारे तरुण अपघातस्थळी मदतीसाठी दाखल झाले होते. या तरुणांना आता कोरोनाची लागण झाली आहे. या अपघातामध्ये मृत्यू पावलेली एक व्यक्ती कोरोना संक्रमित असल्याचे आढळल्यानंतर, आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी स्वयंसेवकांना 14 दिवस वेगळे राहण्याच्या सुचण्या दिल्या आहेत. (हेही वाचा: केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पाहा व्हिडिओ)

दरम्यान, बुधवारी केरळमध्ये कोविड-19 च्या 2,333 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यानंतर संक्रमितांची संख्या 50,231 झाली आहे. त्याचबरोबर एकूण मृतांची संख्या वाढून 182 झाली आहे.