केरळ: आईच्या अमानुष मारहाणीत 3 वर्षांचा मुलगा कोमात
Representational Image (Photo Credits: ANI)

केरळमधील (Kerala) कोची (Kochi) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांचा चिमुकला ऐकत नाही म्हणून आईने मुलाला बेदम मारहाण केली. लाकडी दांडक्याने अमानुषरीत्या मारहाण केल्याने या चिमुकल्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून तो सध्या कोमात आहे.

बुधवारी रात्री अलुवा येथील एका खाजगी रुग्णालयात तीन वर्षांच्या मुलाला दाखल करण्यासाठी एक व्यक्ती आला. मुलगा टेबलवरुन खाली पडला असे त्याचे म्हणणे होते. मात्र मुलाची गंभीर परिस्थिती आणि अंगावरील चटक्यांचे डाग पाहून डॉक्टरांना संशय आला. अखेर डॉक्टरांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. (नातेवाईकांकडून महिलेला विवस्त्र करुन मारहाण; औरंगाबाद येथील घटना)

पोलिसांच्या कसून चौकशी नंतर हा अमानुष प्रकार समोर आला. ही महिला मुळची झारखंडची असून मुलगा खूप मस्ती करतो, ऐकत नाही म्हणून तिने मुलाला मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या मेंदूच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसंच पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांनी झारखंड पोलिसांशी संपर्क साधला आहे.