COVID 19: खुशखबर! केरळ मधील नव्वदीच्या जोडप्याने केली कोरोना वर मात
Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

देशात दर दिवशी कोरोनाच्या रुग्णांची (Coronavirus) संख्या वाढत असताना केरळ मधून आता एक खुशखबर समोर येत आहे. प्राप्त माहितीनूसार, कोट्टायम मेडिकल कॉलेज मधून थॉमस (Thomas) नामक 93 वर्षीय व्यक्तीने आपल्या 88 वर्षीय पत्नी मरियाम्मा (Mariyamma) यांच्या सहित कोरोना व्हायरसवर मात केली आहे. सोमवारी 30 मार्च रोजी या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. 5 मार्च रोजी या जोडप्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. या दोघांना हायपरटेन्शन, मधुमेह यांसारखे अनेक आजार सुद्धा होते. अशातच थॉमस यांना उपचाराच्या दरम्यान हृदयविकाराचे सौम्य झटके सुद्धा आले होते. सुरुवातीला उपचाराच्या दरम्यान थॉमस आणि त्यांच्या पत्नीला वेगवेगळ्या रुम मध्ये ठेवण्यात आले होते मात्र काही दिवसांपूर्वी त्या दोघांना ट्रान्सप्लांट आयसीयू मध्ये ठेवण्यात आले होते इथे हे दोघेही केवळ एकमेकांना पाहू शकत होते. मात्र एकमेकांच्या साथीने आणि प्रबळ इच्छाशक्तीने आता थॉमस आणि मरियाम्मा यांनी कोरोनावर मात केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या दाम्पत्याचा मुलगा आणि त्याचं कुटुंब 20 फेब्रुवारी रोजी इटलीमधून भारतात परतलं होतं. यानंतर 5 मार्च रोजी खबरदारी चा पर्याय म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. यावेळी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.यांनतर तब्बल 25 दिवस उपचार घेतल्यावर काल 30 मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या जोडप्यासहीत त्यांचा मुलगा, सून आणि आणखी दोन नातेवाईकांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र याचवेळी या दाम्पत्यावर उपचार करणाऱ्या एका नर्सला कोरोनाची लागण झाली असून आता तिच्यावर मात्र उपचार सुरु आहेत. Coronavirus च्या संकटाला लढा देण्यासाठी राहुल गांधी यांनी सांगितल्या 'या' 5 TIPS; नरेंद्र मोदी सरकारला दिला मोलाचा सल्ला

दुसरीकडे,मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करताना हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांचा लळा लागला होता त्यामुळे या दाम्पत्याला डिस्चार्ज देताना डॉक्टर, नर्स सहित सर्वानी टाळ्या वाजवून त्यांना आनंदाने निरोप दिला. केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या या समर्पणाचे कौतुक केले आहे.