मुंबई: KEM मध्ये वृद्धावर उपचार न करता त्याला पादचारी मार्गावर सोडून दिल्याच्या  प्रसार माध्यमांमधील वृत्तावर रुग्णालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण
KEM Hospital (Photo Credits-Facebook)

Mumbai: मुंबईत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला असून नागरिकांना वारंवार नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. अशातच काही ठिकाणी रुग्णांची उपचारासाठी होणारी गैरसोय पाहरता महापालिकेकडून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच आता मुंबईतील केईएम रुग्णालयात एका वृद्धावर उपचार न करता त्याला पादचारी मार्गावर सोडून दिल्याचे वृत्त सध्या प्रसार माध्यमांमध्ये दाखवले जात आहे. याच वृत्तावर आता केईएम रुग्णालयाने या संदर्भातील एक पत्रक काढून स्पष्टीकरण दिले आहे.

केईएम रुग्णालयाने असे म्हटले आहे की, या रुग्णाच्या उपचारामध्ये कोणतीही हेळसांड करण्यात आलेली नाही. तर सदर वृद्धाला प्रवेशद्वाराजवळ नेऊन सोडणाऱ्या कंत्राटी बहुउद्देशीय दोन आरोग्य कामगारांची रुग्णालयाकडून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसेच ही अनोळखी व्यक्ती असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी (7 मे) रात्री 11 वाजता कक्ष क्रमांक-4 अ मधील निवासी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेला हा रुग्ण पोटदुखीने त्रस्त होता.  त्यामुळे शस्रक्रिया तज्ञांच्या सल्ल्यासाठी  नवीन इमारतीच्या  तळमजल्यावर असलेल्या ईएमआरमध्ये पाठवण्यास सांगितले होते.  त्यासाठी त्याच्यासोबत त्या दोन कंत्राटी कामगारांना पाठवले होते.(KEM Hospital बाहेर मुंबईच्या डबेवाल्यांकडून अन्नवाटप See Pics)

Tweet: 

परंतु काही वेळाने एका नागरिकाने ही घटना शूट करुन सदर रुग्ण प्रवेशद्वार क्रमांक 6 बाहेप आणून सोडत असल्याची बाब रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शना आणून दिली.त्यावेळी तत्काळ या रुग्णाला कक्ष क्रमांक-4 अ मध्ये पुन्हा दाखल करुन त्याच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले.  तर रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार केले जात असल्याचे रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निर्देशित केलेल्या ठिकाणी न जाता हा रुग्ण प्रवेशद्वाराबाहेर कसा गेला हे जाणून घेण्यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाने सीसीटीव्ही फूटेज पाहिले. तेव्हा कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आणि त्यांना काढून टाकण्यात आले आहे.

केईएम रुग्णालयात हजारो कोरोनाग्रस्तांवर  उपचार केले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला अज्ञात रुग्णांना सुद्धा दाखल केले जात आहे. गत वर्षात कोविडग्रस्त सुमारे साडेसहा हजारांहून अधिक रुग्णांना उपचारासाठी तर प्रसंगी अनेक रुग्णांनाअत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आले. कोरोनाग्रस्तांव्यतिरिक्त अन्य आजारांचे सुद्धा शेकडो रुग्ण दाखल होत असतात. तर केईएम रुग्णालयात कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही आणि यापुढे ही हाच नियम लागू असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.