
कर्नाटक (Karnataka) राज्यातील रायचूर (Raichur Distric) तालुक्यात एका व्यक्तीने धक्कादायक कृत्य केले आहे. या व्यक्तीने आपल्या 14 महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या व्यक्तीला पुनर्विवाह करायचा होता. हे बाळ त्यात अडथळा ठरेल म्हणून त्याने पोटच्या मुलालाच संपवले. जन्मदाता बाप इतका निर्घृण वागूच कसा शकतो असा सवाल या घटनेनंतर उपस्थित केला जातो आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव महांतेश (वय 32 वर्षे) असून तो लिंगसुगुर तालुक्यातील कनसवी गावचा रहिवासी आहे. मृत मुलाचे नाव अभिनव होते. महातेश याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आपल्या पत्नीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याने त्याला दुसरे लग्न करायचे होते. मात्र, पहिल्या पत्नीपासून होणारे मूल अडसर ठरेल, असे त्याला वाटल्याने आपण ही हत्या केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आरोपकडे केलेल्या अधिक चौकशीत पुढे आलेली माहिती अशी की, त्याने मुलाची हत्या करून मृतदेह गावातील छोट्या दगडाखाली लपवून ठेवला. बाळ बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना संशय आला आणि महांतेशची चौकशी केली. आधी त्याने मृतदेह जाळल्याचे सांगितले आणि तीन दिवसांनी त्याने मुलाचा मृतदेह कुठे लपवून ठेवला होता ते दाखवले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी मुदगल पोलीस तपास करत आहेत.
घडल्या प्रकारामुळे परिसरात घळबळ उडाली आहे. जन्मदाता बापच अशा टोकाला जाऊ शकतो, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इतकेच नव्हे तर जर त्याला दुसऱ्यांदा विवाह करायचा होता तर त्यात त्या बाळाचा काय दोष होता? असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे. अशा घटनांमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले जाते, असे मत सामाजिक समस्यांचे अभ्यासक व्यक्त करत आहेत.