Congress Releases Manifesto | Photo: ANI

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात 200 युनिट मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. कुटुंबातील प्रत्येक महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये दिले जातील. बेरोजगार पदवीधरांना दरमहा 3,000 रुपये आणि 2 वर्षांसाठी बेरोजगार पदविकाधारकांना 1,500 रुपये प्रति महिना दिले जातील. यासोबतच काँग्रेसने सर्व महिलांना KSRTC/BMTC बसमधून मोफत प्रवास करण्याची घोषणा केली. काँग्रेसने निवडणूक जिंकल्यास जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. (मोफत गॅस सिलिंडर आणि प्रतिदिन अर्धा लिटर नंदिनी दूध, कर्नाटकात भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध)

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि पीएफआयचा हवाला देत द्वेषी संघटनांवर बंदी घालण्यासह कारवाईचे आश्वासन दिले आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्षांसह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

निवडणुकीत पक्ष विजयी झाल्यास राज्यातील आरक्षण 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसने अण्णाभाग्य योजनेंतर्गत 10 किलो तांदळाच्या हमीभावाचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने पीक नुकसान भरपाईसाठी 5000 कोटी रुपये (दरवर्षी 1000 कोटी रुपये) देण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच दुधावरील अनुदान 5 रुपयांवरून 7 रुपये केले जाईल आणि नारळ उत्पादक शेतकरी आणि इतरांसाठी एमएसपी सुनिश्चित केली जाईल.