Yogi Adityanath On Nashik Hanuman Birthplace: 'हनुमानाचा जन्म कर्नाटकात', योगी आदित्यनाथ यांचे वादग्रस्त वक्तव्य
योगी आदित्यनाथ (Photo Credit: PTI)

Nashik Hanuman Birthplace Row: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक (Karnataka) संघर्ष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी भगवान हनुमान यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाल्याचे म्हटले आहे. हनुमानाच्या जन्मस्थळावरुन (Hanuman Birthplace) काही दिवसांपर्वीच वाद निर्माण झाला होता. त्यावर पडदा पडला होता. मात्र, आता योगींनी केलेल्या वक्तव्यामुळे हनुमान जन्माचा वाद पुन्हा उफाळला आहे. नाशिक येथील साधू महंतांनी योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. तसेच, योगींचे काम स्तुत्य आहे परंतू त्यांनी राजकारणात धर्माला आणून राजकारण करु नये असे मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नाशिक (Nashik) शहराजवळील (Trimbakeshwer) येथील अंजनेरी (Anjneri) येथे भगवान हनुमानाचा जन्म झाल्याचे मानले जाते. पुरानात तसे दाखलेही दिले जातात. मात्र, हनुमानाच्या जन्मस्थळाचा अधूनमधून वाद उद्भवतो. मध्यंतरीही हनुमान जन्माचा वाद वाढला होता. यावर अयोध्येतील आचार्य गंगाधर पाठक यांनी अंजनेरी हेच जन्मस्थळ असल्यावर शिक्कामोर्तब केले आणि वाद निकाली निघाला. मात्र, आता योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यामुळे हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (हेही वाचा, Lord Hanuman Birthplace Controversy: हनुमानाच्या जन्मस्थानावरून नवा वाद; प्रकरण मिटवण्यासाठी नाशिकमध्ये बोलावण्यात आली धर्मसंसद)

कर्नाटकराज्यात विधानसभा निवडणुका सुरु आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारासाठी योगी आदित्यनाथ भाजपचा प्रचार करत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाच्या जन्मस्थळाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हनुमानाचा जन्म कर्नाटकात झाला असल्याचे योगींनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हनुमानाच्या जन्माचा वाद पेटू लागला आहे. योगींचे वक्तव्य येताच नाशिक येथील संत महंतांनी योगींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.