झारखंड (Jharkhand) येथील रांची (Ranchi) मध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेमध्ये डॉक्टरने एका महिलेला पोटदुखीवर औषध म्हणून चक्क कॉन्डोम (Condom) विकत घेण्यास सांगितल्याचे समजत आहे. घाटसीला (Ghatsila) या भागात जुलै महिन्यात ही घटना घडली आहे. झालं असं की, पोटदुखीने त्रस्त एक 55 वर्षीय महिला घाटसीला उपविभागीय सरकारी दवाखान्यात गेली होती. यावेळी डॉ. अश्रफ बद्र (Ashraf Badr) यांनी या महिलेची केस हाताळली. महिलेच्या तक्रारी ऐकून घेतल्यावर डॉक्टरांनी तिला औषधाची चिठ्ठी दिली ज्यात जवळच्या केमिस्टच्या दुकानात जाऊन कॉन्डोम विकत घेण्यास सांगितले होते. या प्रकारांनंतर महिलेने लगेचच पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी देखील ही तक्रार येताच डॉ. अश्रफ यांच्याविरुद्ध चौकशी कमिटी नेमली, या कमिटीने सादर केलेल्या अहवालात अश्रफ यांना नोकरीवरून बडतर्फ करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, घाटसीला येथील सरकारी रुग्णालयात डॉ. अश्रफ हे 1 वर्षाच्या करारावर कार्यरत होते. या प्रकरारानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तीन अधिकाऱ्यांची एक कमिटी नेमली होती, 2 ऑगस्ट रोजी या कमिटीतर्फे रिपोर्ट सादर करण्यात आला, ज्यामध्ये डॉ. अश्रफ हे आरोपी सिद्ध झाले आहेत. याबाबत डॉ. महेश्वर प्रसाद यांनी माहिती देत राज्य आरोग्य विभागाकडे डॉ. अश्रफ यांच्या बडतर्फीचे आदेश आल्याचे सांगितले. तसेच काही दिवसात आरोग्य विभाची एक मीटिंग बोलावून यामध्ये अश्रफ यांच्या बाबतचा निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले.
(हे हि वाचा- झारखंड: 3 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून छाटलं मुंडकं, अनुष्का शर्मा ने ट्विट करून व्यक्त केला संताप)
दरम्यान, या सर्व प्रकरणी डॉ अश्रफ यांनी अगदी उलट प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हणत आपल्याला या मध्ये मुद्दाम गोवले हजार असल्याचेही अश्रफ म्हणाले. तसेच आपण अशाप्रकारे औषधाची चिठ्ठी लिहून दिल्याचे आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्रफ यांच्यावर गैरवर्तवणुकीसाठी आधीही अनेक आरोप लागवण्यात आले आहेत. सध्या करत असलेल्या नोकरीतही त्यांच्याकडून सुरवातीला आपल्या योग्य वागणुकीची लेखी हमी घेण्यात आली होती.