
देशात कोरोना विषाणूचे (Coronavirus) सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण समोर येत आहेत. अशात सरकारने अनेक कार्यक्रमांबाबत काही नियम लागू केले आहेत. मात्र या नियमांची पर्वा न करता अनेकजण स्वतःची मनमानी करत असल्याचे दिसून येत आहे. आता शनिवारी कोरोना व्हायरस संक्रमणाने हैदराबाद (Hyderabad) शहरातील एका प्रसिद्ध ज्वेलर्स (Jeweller) चा मृत्यू झाला. मात्र त्याने काही दिवसांपूर्वी बर्थडे पार्टी (Birthday Party) आयोजित केली होती, ज्यात किमान 100 लोक उपस्थित होते. कोविड-19 मुळे झालेल्या या मृत्यूमुळे शहरात घबराटीचे वातावरण असून, पार्टीमध्ये सामील झालेले लोक आता आपली कोरोना विषाणू चाचणी करून घेत आहेत.
याशिवाय अनेक दागिन्यांची दुकाने चालवणाऱ्या आणखी एका मोठ्या ज्वेलर्सचा शनिवारी मृत्यू झाला. ही व्यक्तीही त्याच वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित होती. अधिकाऱ्यांना संशय आहे की या व्यक्तीला त्याच वाढदिवसाच्या पार्टीत संसर्ग झाला असावा. नुकत्याच झालेल्या या पार्टीत ज्वेलर्स असोसिएशनच्या किमान 100 सदस्यांनी हजेरी लावली होती. पार्टीच्या दोन दिवसानंतर, होस्ट ज्वेलरमध्ये कोविड-19 ची लक्षणे दिसायला सुरुवात झाली, त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. आरोग्य अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणात संपर्क ट्रेसिंगची प्रक्रिया सुरू केली आहे.
(हेही वाचा: Coronavirus Update: मागील 24 तासात BSF च्या 36 जवानांना कोरोनाची लागण, 33 जणांची कोरोनावर मात)
दरम्यान, हैदराबादमध्ये एखाद्या पार्टीत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी आपल्या मुलाच्या जन्माबद्दल मिठाई वाटप करणारा पोलिस कॉन्स्टेबलही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यानंतर ज्यांना त्याने मिठाई वाटल्या त्यांच्यापैकी 12 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक जी. श्रीनिवास राव म्हणतात, ‘हे सुपर-स्प्रेडर्स (Super-Spreaders) आहे, ज्यामुळे हैदराबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या वाढली आहे. एवढी जनजागृती करूनही काही लोक नियमांचे पालन करीत नाहीत. वाढदिवस पार्टी करण्यासाठी, मुलाचा जन्म साजरा करण्यासाठी, फॉरेन रिटर्नचे स्वागत करण्यासाठी लोक एकत्र येत आहेत व हे चुकीचे आहे.