Curfew | Representational Image | (Photo Credits: IANS)

गेल्या वर्षा अनपेक्षितपणे परदेशातून भारतात आलेल्या एका विषाणूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. ज्या विषाणूचे नाव होते 'कोरोना व्हायरस' (Coronavirus)...जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात हा विषाणू डोकं वर काढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी पहिला 'जनता कर्फ्यू' (Janta Curfew) घोषित केला होता. या दिवसाला आज एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी याच दिवशी संपूर्ण देशात सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यू झाला होता. यावेळेत नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती, जीवनावश्यक सेवा वगळता आज सारे व्यवहार ठप्प राहणार आहेत. मोदींच्या या निर्णयाला देशाभरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

या दिवशी देशभरातील सर्व रस्ते ओस पडले होते. कुणीही घराबाहेर पडले नव्हते. सर्वत्र शुकशुकाट होता. व्यापार, उद्योग, कला, क्रिडा, मनोरंजन क्षेत्र सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते.हेदेखील वाचा- Janata Curfew: आपला संयम आणि निर्धार कोरोना व्हायरसवर मात करील - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सर्वांनी घरात आपल्या कुटूंबासोबत राहून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला होता.

एवढंच नव्हे तर याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधानांनी समस्त भारतवासियांना टाळ्या, थाळ्या किंवा घंटी वाजवून आपल्याला या कठीण परिस्थितीत साथ देणारे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचे आभार मानावे, असेही सांगितले होते. या उपक्रमाला देखील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

या उपक्रमात सामान्यांसह कलाकार, खेळाडूंसारखे दिग्गजांनी देखील सहभाग घेतला होता.

मात्र काही लोकांनी या उपक्रमाचता चुकीचा अर्थ काढून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन या जनता कर्फ्यूचा बट्ट्याबोळ केला.

आज या दिवसाला एक वर्ष होऊन गेले. आजही कित्येकांना हा दिवस आठवला तरी अंगावर काटा येईल. 24 तास कार्यरत असलेली मुंबई देखील एकाएकी बंद पडली होती. ही शांतता सर्वांनाच येणा-या वादळाची सूचना देऊन गेली. त्यानंतर लोकांच्या चुकीमुळे कोरोना व्हायरसने गेले वर्षभर भारतात हैदोस घातला. मात्र 2021 च्या सुरुवातीला ही परिस्थिती ब-यापैकी आटोक्यात आली होती. मात्र फेब्रुवारी पासून ही संख्या पुन्हा वाढू लागली. मात्र अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळीच स्वत:ला आवरा. कोरोनाच्या नियमांचे पालन करा. नाहीतर गेल्या वर्षी एका दिवसासाठी ठेवण्यात आलेला जनता कर्फ्यू यावर्षी दीर्घकाळासाठी भारतात वास्तव्य करेल.