Jammu & Kashmir: शोपियाँ जिल्ह्यात भारतीय सैन्याकडून 3 दहशतवादी ठार; हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधाचे अंंदाज
Security forces in Jammu and Kashmir | File Image | (Photo Credits: IANS)

जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir) मधील शोपियाँ (Shopian) जिल्ह्यातील तुर्कवांगम (Turkwangam) भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी मंगळवारी पहाटे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने दोन AK-47 आणि एक INSAS जप्त केले आहे. याठिकाणी अजूनही शोधमोहीम सुरू आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, आज, 16 जून रोजी पहाटे जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलातर्फे शोध मोहीम सुरु केली होती. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. या चकमकीत तीन अज्ञात दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. हे सर्व स्थानिक दहशतवादी असून ते हिजबुल मुजाहिद्दीन संबंधित होते असे अंदाज आहेत. जम्मू-काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात एक जवान शहीद, 2 जखमी

सूत्रांच्या माहितीनुसार, तिन्ही दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव झुबैर असे असून तो दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीन चा शोपियाँ मधील कमांडर असल्याची शक्यता आहे. तर झवूरा येथील कामरान मिन्हास आणि मुन्नेद उल इस्लाम अशी अन्य दोघांची नावे असल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. तथापि, अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

शोपियन चकमकीची काही दृश्य, पहा ट्विट

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील शोपियां, पुलवामा आणि कुलगाम या तीन जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यांत 16 स्थानिक अतिरेकी ठार झाल्याची माहिती आहे. अगदी काल म्हणजे सोमवार 15 जून रोजीच पाकिस्तान तर्फे पहाटे तांगधार सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील शस्त्रबंदीचे उल्लंघन करण्यात आले होते . 14 जून रोजी सुद्धा बारामुल्ला भागात LOC चे उल्लंघन करण्यात आले होते. या कुरघोड्यांना भारतीय सैन्याकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे.