Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

सध्या कोरोना विषाणूवर (Coronavirus) मात देण्यासाठी भारतामध्ये लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. देशात लाखो लोकांना डोस दिल्यानंतर आता लसीची कमतरता भासत असल्याच्या तक्रारी काही राज्यांनी केल्या आहेत. त्यात जयपूरच्या (Jaipur) कांवटिया या शासकीय रूग्णालयात (Kanwatia Hospital) लस चोरीचे प्रकरण समोर आले आहे. कोल्ड स्टोरेजपासून लस केंद्रापर्यंत घेऊन जात असताना, कोवॅक्सिन लसीच्या 32 कुपी चोरीस गेल्या आहेत. एका व्हायलमध्ये 10 डोस असतात. यानंतर मुख्य वैद्यकीय अधिकारी नरोत्तम शर्मा यांच्या सूचनेवरून, जयपूरच्या कांवटिया रुग्णालयाच्या अधीक्षकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जयपूरमध्ये कोरोनाची लस संपली आहे आणि लसीकरण थांबविण्यात आले आहे. आता अशी भीती व्यक्त केली जात आहे की, रूग्णालयाने आपल्या लोकांना लस देऊन त्याचा साठा कमी असल्याचे दाखवले आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, कांवटिया येथील शासकीय रुग्णालयात लसीच्या 320 डोसची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी भादंवि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

12 एप्रिल रोजी जयपूरच्या कांवटिया हॉस्पिटलमध्ये कोवॅक्सिनचे डोस आले. त्याच दिवशी जेव्हा रुग्णालयाने स्टॉक तपासला तेव्हा त्यामध्ये 320 डोस कमी असल्याचे आढळले. या घटनेनंतर रुग्णालयात खळबळ उडाली आहे. अशी शंकाही व्यक्त केली जात आहे की लसीचे डोस बाहेर चढ्या किंमतीमध्ये विकले गेले असावेत. राजस्थानात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत पाच हजाराहून अधिक कोरोना संसर्गाची नोंद झाली असून, 28 लोक मरण पावले आहेत. (हेही वाचा: लस निवडीचा पर्याय असतो का? ते स्मार्टफोन नसल्यास रजिस्ट्रेशन कसं करायचं? CoWIN Portal वर लसीच्या रजिस्ट्रेशन बाबत काही प्रश्नांची उत्तरं इथे घ्या जाणून)

यापूर्वी राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी राज्यात कोरोना विषाणू आजाराविरूद्ध लस नसल्याचा दावा केला होता. दरम्यान, कोविड-19 लस इतर देशांकडून घेण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे दिसत आहे. देशातील कोविड-19 प्रकरणे वाढत असताना आता, परदेशी निर्मित लसीच्या वापरला सरकारने मंजुरी दिली आहे.