Tejas Express (Photo Credits: Instagram)

भारतीय रेल्वेची (Indian Railway) उपकंपनी असलेल्या, भारतीय रेल्वे पर्यटन आणि केटरिंग कॉर्पोरेशन (IRCTC) ने 30 एप्रिलपर्यंत आपली रेल्वे सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आयआरसीटीसी देशात तीन खासगी गाड्या चालवते. या निर्णयानंतर या तिन्ही गाड्या 30 एप्रिलपर्यंत थांबविण्यात आल्या आहेत. मंगळवार 7 एप्रिल रोजी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या तिन्ही गाड्यांचे बुकिंग पूर्वी 25 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत देशव्यापी लॉकडाऊनमुळे बंद होते, परंतु लॉकडाऊन कालावधीनंतर प्रवासासाठी तिकिट बुकिंग करण्यास परवानगी होती.

आयआरसीटीसी चालवत असलेल्या या तीन गाड्या, वाराणसी-इंदूर मार्गावर धावणारी काशी महाकाल एक्सप्रेस, लखनऊ-नवी दिल्ली तेजस एक्स्प्रेस आणि अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेस अशा आहेत. देशातील कोरोना विषाणूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, हे लक्षात घेऊन 30 एप्रिलपर्यंत गाड्या न चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या काळात तिकिट बुक केलेल्या सर्व प्रवाशांना त्याचा संपूर्ण परतावा मिळेल. (हेही वाचा: लॉक डाऊनमुळे भारताचे दररोज 8 अब्ज डॉलर्सचे नुकसान; Lockdown वाढल्यास देशाची ग्रोथ 3 टक्क्यांनी कमी होण्याची भीती)

दरम्यान, भारतातील रेल्वेचे जाळे हे लांब आणि जवळजवळ सर्वत्र पसरले आहे. एका दिवसात लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. परंतु गेल्या काही आठवड्यांपासून ही सेवा पूर्णपणे बंद आहे. 14 एप्रिलला लॉकडाऊन संपल्यास गाड्यांची हालचाल काही प्रमाणात सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण आता आयआरसीटीसीने घेतलेल्या या निर्णयानंतर हे शक्य नसल्याचे दिसत आहे. आयआरसीटीसी व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी एअर इंडियानेही 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे बुकिंग बंद करण्याचा निर्णय घेतला होता.