'The Kashmir Files करमुक्त करण्याऐवजी, विवेक अग्निहोत्रीने आपला चित्रपट YouTube वर अपलोड करावा' - Arvind Kejriwal (Watch Video)
Arvind Kejriwal | (Photo Credits: Facebook)

काश्मिरी पंडितांचे हत्याकांड आणि विस्थापनावर आधारीत 'द काश्मीर फाईल्स' या (The Kashmir Files) चित्रपटाची चित्रपटगृहापासून ते घराघरात चर्चा होत आहे. देशातील 8 राज्यांनी हा चित्रपट करमुक्त केला आहे. बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच दिल्ली विधानसभेत गदारोळ माजला. विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होताच, उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या अभिभाषणात व्यत्यय आणत राजधानीतही 'द काश्मीर फाईल्स' करमुक्त करण्याची मागणी केली. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्नोहोत्री याने आपला चित्रपट युट्युबवर अपलोड करण्याची मागणी केली.

दिल्ली विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून सुरू झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता एलजीच्या अभिभाषणाने सत्राची सुरुवात झाली. त्यावेळी सदनात प्रचंड गोंधळ सुरू झाला. 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करत भाजप आमदारांनी घोषणाबाजी केली.

याला प्रत्युत्तर देताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘द काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याऐवजी तो युट्युबवर अपलोड करावा सर्वांना मुक्तपणे पाहता येईल. हा चित्रपट करमुक्त करण्याची गरजच काय? विवेक अग्निहोत्रीने युट्युबवर अपलोड केल्यास सर्वजण तो एका दिवसात पाहू शकतील.’ यावेळी केजरीवाल यांनी भाजप नेत्यांना 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाचे प्रमोशन थांबवण्याची मागणी केली. अधिवेशनाला संबोधित करताना केजरीवाल यांनी केंद्र सरकारची तुलना हिटलरशी केली. (हेही वाचा: चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसोबत पहिला 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट (Watch Video)

अरविंद केजरीवाल यांनी ही प्रतिक्रिया अशा वेळी दिली आहे जेव्हा भाजपच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी काश्मीर फाइल्स करमुक्त करण्याची मागणी केली होती. चित्रपट करमुक्त न करण्यावर ते म्हणाले होते की, जेएनयूमध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणांचे समर्थन करणाऱ्या, सर्जिकल स्ट्राईकवर आणि भारताच्या अभिमानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, ‘आप’ची मानसिकता काय असेल याचा अंदाज येऊ शकतो.