भारतीय रेल्वे (Indian Railways) वेळेत न पोहोचल्याचे तुम्ही अनेक किस्से ऐकले असतील. रेल्वेच्या प्रवासात ट्रेन लेट होणार हे जणू समीकरणच बनले आहे. मात्र आजची गोष्ट थोडी वेगळी आहे. भारतीय रेल्वेने बुधवारी एक असे उदाहरण समोर ठेवले जे ऐकून कोणालाही अभिमान वाटेल. बुधवारी, रेल्वेला ट्विटरवर ट्रेनच्या दिरंगाईमुळे एका विद्यार्थिनीची परीक्षा चुकेल अशी तक्रार मिळाली होती. त्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या विद्यार्थिनीला मदत करण्यासाठी लेट होत असलेल्या रेल्वेचा वेग वाढविला आणि तिला वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या मऊ जिल्ह्यातील रहिवासी नाझिया तबस्सुमचा बुधवारी डीएलईडी बॅक पेपर होता. वाराणसीतील वल्लभ विद्यापीठ गर्ल्स इंटर कॉलेज हे परीक्षा केंद्र होते, जिथे 12 वाजता पेपर सुरु होणार होता. परीक्षा देण्यासाठी नाझियाने वाराणसी सिटी एक्स्प्रेसमध्ये तिकीट बुक केले होते, परंतु बुधवारी ट्रेन अडीच तासापेक्षा जास्त लेट होती. ट्रेन लेट झाल्याने परीक्षा चुकण्याची भीती होती. त्यामुळे नाझियाचा भाऊ अन्वरने ट्विटरवर रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. (हेही वाचा: IRCTC कडून ऑनलाईन बस तिकिट सर्विस लॉन्च, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया)
त्यानंतर लगेच रेल्वे प्रशासन सक्रिय झाले. रेल्वेने अन्वरचा फोन नंबर घेतला आणि फोनवर रेल्वे अधिकाऱ्यांनी परीक्षेसंबंधी माहिती घेतली. संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर रेल्वेने अन्वरला त्याच्या बहिणीची परीक्षा चुकणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रेल्वेने रेल्वेचा वेग वाढविला व यामुळे नाझिया वेळेत वाराणसीला पोहोचली. जनसंपर्क अधिकारी एनईआर अशोक कुमार म्हणाले की, मुलीला नियमानुसार मदत केली गेली. बलिया-फेफना रेल्वे मार्ग स्पीड ट्रायलसाठी ब्लाॅक केला गेला होता. मॉनिटरिंग करताना रेल्वेची पंक्चुएलिटी मेकअप केली गेली. रेल्वेने दाखवलेल्या या वक्तशीरपणामुळे नाझियाच्या कुटुंबाने रेल्वेचे आभार मानले आहेत.