ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या संख्येत होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता, या सणासुदीच्या हंगामात भारतीय रेल्वे (Indian Railways) सुमारे 200 जादा गाडय़ा चालविणार आहे. ज्या गाड्यांच्या क्लोन ट्रेन चालू आहेत अशा गाड्यांच्याच अधिक क्लोन ट्रेन चालविल्या जाऊ शकतात. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव (V K Yadav) यांनी गुरुवारी सांगितले की, भारतीय रेल्वे सणाच्या हंगामात 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान 200 विशेष गाड्या चालवण्याचा विचार करीत आहे. रेल्वेने सध्या सर्व सामान्य प्रवासी गाड्या अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत. या गाड्या 22 मार्चपासून रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वेने 12 मेपासून दिल्लीला देशाच्या विविध भागांशी जोडणार्या विशेष 15 राजधानी गाड्या चालविण्यास सुरूवात केली आणि एका जूनपासून लांब पल्ल्याच्या 100 गाड्यांची वाहतूक सुरू केली. 12 सप्टेंबरपासून आतापर्यंत रेल्वे 80 अतिरिक्त गाडय़ा चालवित आहे. आता 200 गाड्या चालवण्याबाबत यादव म्हणाले, ‘आम्ही झोनच्या सरव्यवस्थापकांशी बैठक घेऊन त्यांना स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करण्याचे आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे आणि सणासुदीच्या काळात किती विशेष गाड्या चालवल्या जातील यावर आधारित निर्णय घेण्यात येईल. (हेही वाचा: कोरोना व्हायरस उपचारांसाठी ICMR व Biological E. चे मोठे यश; विषाणूविरुद्धचा प्रतिकार वाढविण्यासाठी तयार केला Antisera)
ते पुढे म्हणाले की, ‘सध्या, अंदाजे 200 गाड्या धावतील असा आमचा अंदाज आहे, पण आमचा अंदाज आहे, ही संख्या अजून वाढू शकते. राज्य सरकारच्या गरजा आणि कोरोना साथीच्या परिस्थितीचा विचार करता रेल्वेने दररोज प्रवाशांच्या सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडच्या या काळात आम्ही दररोज गाड्यांची आवश्यकता, रहदारी आणि परिस्थितीची समीक्षा करू. आवश्यक तेथे आम्ही गाड्या चालवू.’ सध्या रेल्वे देशातील राज्यांशी समन्वय साधत आहे. एकाच वेळी अनेक गाड्यांची घोषणा करण्याऐवजी रेल्वे बोर्ड दररोज दोन ते चार गाड्या सुरू करीत आहे.