शताब्दी एक्सप्रेस मध्ये धोतर कुर्ता आणि चप्पल घालून जाणाऱ्या वृद्धाला अधिकाऱ्याने दाखवला बाहेरचा रस्ता, इतिहासातील 'या' घटनेची पुनरावृत्ती
धोतर कुर्ता घातल्याने शताब्दी एक्सप्रेस मध्ये प्रवेश नाकारला (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेश: शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) मधील अधिकाऱ्यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीला चक्क पेहरावावरून ट्रेनमध्ये प्रवेश नाकारल्याची बाब समोर आली आहे. या प्रवाशापाशी आपले कन्फर्म तिकीट असूनही केवळ धोतर कुर्ता आणि पायात रबरी चप्पल घातली आहे म्हणून टीटीईने त्यांना प्रवेश निषिद्ध केला होता. उत्तर प्रदेशात घडलेली ही घटना इतिहासातील अशाच एका किस्स्याची आठवण करून देते. 1983 मध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi)  हे दक्षिण आफ्रिकेत (South Africa) ट्रेनमधून प्रवास करत असताना त्यांना सुद्धा अशाच प्रकारे धोतर कुर्ताचा पोशाख पाहून ट्रेनमधून उतरवण्यात आले होते. त्यावेळी गांधी हे कृष्णवर्णीय असल्याचे कारण देण्यात आले होते. दरम्यान या घटनेविषयी संबंधित वृद्ध प्रवाशाने रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत रितसर नोंद केली आहे.

हे ही वाचा-बीड: भिल्ल समाजातील कुटुंबाने गाव सोडून जाण्यास नकार दिल्याने जमावाकडून जबर मारहाण

जाणून घ्या संपूर्ण प्रकार कसा घडला?

उत्तर प्रदेशातील बाराबंकी परिसरात राहणारे बाबा रामअवध दास यांनी 4  जुलै ला इटावा स्थानकापासून ते गाझियाबाद पर्यंत जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट बुक केले होते. त्यांना त्याच वेळी एक कन्फर्म तिकीट सीट सुद्धा मिळाली होती. पण जेव्हा सकाळी ते शताब्दी एक्सप्रेस मध्ये चढण्यासाठी गेले तेव्हा तिथल्या शिपायाने त्यांना ट्रेन बाहेरच थांबवले. हा गोंधळ ऐकून ट्रेनचे तिकीट तपासणी अधिकारी व कोच अटेंडंट सुद्धा त्याठिकाणी आले मात्र याप्रकरणी या वृद्धाची मदत करण्याऐवजी त्यांनी सुद्धा त्यांना ट्रेनमध्ये प्रवेश घेण्यापासून मज्जाव केला. यावेळी दास यांनी वारंवार आपल्याकडील तिकीट सुद्धा दाखवले मात्र तरीहि त्यांची कोणतीच मदत करण्यात आली नाही.

दरम्यान ट्रेनची वेळ झाल्याने गाडीने स्थानकातून प्रस्थान केले, या घटनेने त्रासलेले दास यांनी लगेचच स्टेशन मास्टरांच्या ऑफिसात जाऊन याबाबत रीतसर तक्रार नोंदवली, मात्र या सगळ्यात त्यांची गाडी सुटल्याने त्यांना नाईलाजाने बस पकडून गाझियाबादला जावे लागले.