Ladakh (Photo Credits: AFP/ Representational Image)

नुकतेच एएनआय वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व लडाखच्या (Eastern Ladakh) गलवान व्हॅलीमध्ये (Galwan Valley) चिनी सैनिकांशी (Chinese Troops) झालेल्या हिंसक झटापटीत, 20 भारतीय सैनिक (Indian Soldiers) शहीद झाले आहेत. आता याबाबत भारतीय लष्कराने (Indian Army) जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, '15-16 जून दरम्यान मध्यरात्री झालेल्या  झटापटीनंतर, आत गलवान व्हॅली येथे भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये डिसएंगेजमेंट झाली आहे. सशस्त्र दलांनी या परिसरात झालेल्या हिंसक आक्रमणात 20 भारतीय सैनिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. रिपोर्टनुसार यामध्ये चीनकडील 43 जवान जखमी झाले आहेत व त्यातील काहींचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.'

सैन्याने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘स्टँड ऑफ लोकेशनवर आपले कर्तव्य बजावताना गंभीर जखमी झालेले 17 सैनिक, अतिशय उंच परिसर आणि त्या भागात असलेल्या शून्यापेक्षा कमी तापमानात त्यांच्या जखमा एक्स्पोज झाल्याने, शहीद झाले. या चकमकीत भारतीय सैन्याने आपले एकूण 20 सैनिक गमावले आहेत. भारतीय सैन्य प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी दृढ वचनबद्ध आहे.’

वृत्तसंस्था एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, LAC ओलांडून चीनमधून आलेल्या हेलिकॉप्टरची ये-जा वाढत आहे. ज्याद्वारे ते भारतीय सैन्यासह झालेल्या हिंसक झटापटीत ठार झालेल्या आणि गंभीर जखमी झालेल्या आपल्या सैनिकांना घेऊन जाऊ शकतील. अहवालानुसार, गलवान खोऱ्यात चिनच्या बाजूचे 43 लोक ठार झाले आहेत, ज्यात मृत्यू आणि गंभीर जखमी झालेल्या सैनिकांचा समावेश आहे. (हेही वाचा: गॅलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैन्य दलाचे जवळजवळ 20 जवान शहीद; चीनचे 40 जवान जखमी, त्यातील काही ठार झाल्याचे वृत्त- Reports)

यापूर्वी या हिंसाचारात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाल्याची बातमी आली होती. या हिंसक चकमकीत- तेलंगनाचे कर्नल संतोष बाबू, तामिळनाडूचे हवालदार पलानी राजू आणि झारखंडचे सिपॉय ओझा शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. कर्नल संतोष गेल्या 18 महिन्यांपासून लडाखमध्ये भारतीय सीमेचे रक्षण करत होते. ते 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते.

दरम्यान, 1962 नंतर प्रथमच लडाख भागात सैनिक शहीद झाले आहेत. यासंदर्भात दिवसभर उच्चस्तरीय बैठका सुरु होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचीही बैठक पार पडली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह तीनही सैन्य प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्यासमवेत बैठक घेतली.