नवी दिल्ली: पुलवामा (Pulwama) हल्ल्याच्या नंतर भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) देशातील संबंध आणखीनच बिघडले होते, यामुळे जागतिक स्तरावर झालेली पाकिस्तानची पुरतीच कोंडी झाली आहे, असं असतानाही पाकिस्तानी गुप्तचर संस्थांकडून (Pakistan Spy Agencies) वारंवार भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, याच प्रयत्नातून अलीकडे पाकिस्तानी गुप्तहेर Whatsapp च्या माध्यमातून भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियांवर नजर ठेवून असल्याची माहिती भारतीय सेनेच्या हाती लागली आहे. सूत्रांतर्फे ही माहिती मिळताच आर्मीच्या उच्च अधिकाऱ्यांना Whatsapp च्या वापरात खबरदारी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आर्मीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अज्ञात आयडीच्या मेल वरून धमकावण्यात आले होते, मेल मध्ये असलेल्या लिंक वर क्लिक न केल्यास तुमच्या मुलीचे फोटो व्हायरल करू असा इशारा या गुप्तहेरांनी दिला होता, या अधिकाऱ्याने लिंक वर क्लिक केल्यास त्यांच्या सिस्टीममध्ये या संस्थांचे वायरस शिरून माहिती गहाळ होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर सेनेतर्फे जवान व कुटुंबियांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा धोका टळेपर्यंत जवानांना आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून वर्दीतले फोटो देखील हटवण्यास सांगण्यात आले आहेत, तसेच कोणत्याही व्हाट्सऍप ग्रुपवर खाजगी माहिती शेअर करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.
ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या संपूर्ण परिस्थितीला पाहता भारतीय सेनेने जवान व त्यांच्या कुटुंबासाठी अलर्ट जारी केला आहे, शत्रूंच्या काही गुप्तहेर संस्था या व्हाट्सऍपच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांची माहिती जमा करून त्यांचे प्रोफाइल बनवत आहेत. या हेरांनी भारतीय सेनेच्या काही खाजगी व्हाट्सऍप ग्रुप मध्ये देखील हॅकिंग करून नजर ठेवायला सुरु केले आहे, असेही आर्मीच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.