Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

जगात सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या आजाराचा धोका प्रचंड वाढला आहे. भारतात कोरोना रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, आयसीएमआरने (ICMR) केलेल्या अभ्यासाविषयी माध्यमांमध्ये एक अहवाल व्हायरल होत आहे. यामध्ये देशातील कोरोना संसर्गाचा पीक, म्हणजेच सर्वात जास्त कोरोना प्रकरणे नोव्हेंबरच्या मध्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या अभ्यासाबाबत आलेल्या वृत्ताचे आयसीएमआरने खंडन केले आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की, त्यांच्या वतीने असा कोणताही अभ्यास केला गेला नाही. लॉकडाऊनमुळे देशातील कोरोना साथीच्या रोगाचा पीक 8 आठवडे उशीरा येणार असल्याचा अभ्यास झाल्याचा दावा यामध्ये केला गेला आहे.

आयसीएमआरने माध्यमांमधील बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे. 'काही बातम्यांमधून असे म्हटले जात आहे की, आयसीएमआरने नोव्हेंबरमध्ये कोरोना विषाणू वाढणार असा अभ्यास केला आहे, मात्र ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे. इथे जो आयसीएमआर संदर्भ दिला आहे तो चुकीचा आहे. आयसीएमआरच्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीने याबाबत माहिती दिली नाही.’ (हेही वाचा: कोरोनाचे संकट फार काळ टिकून राहणार नाही, COVID19 वर मात करण्यासाठी लवकरच लस उपलब्ध होईल - नितीन गडकरी)

आयसीएमआरच्या नावाने समोर आलेल्या अभ्यासामध्ये म्हटले आहे की, आयसीएमआरने तयार केलेल्या ऑपरेशन्स रिसर्च ग्रुपच्या संशोधकांनी असा अभ्यास केला आहे की, साथीच्या रोगाला पीकवर पोहोचण्यासाठी लॉक डाऊनने 34-76 दिवस पुढे ढकलले.  पीआयबी (PIB) नेही फॅक्ट चेक करत, ही माहिती आधारभूत असल्याचे सांगितले आहे. पीआयबी म्हटले आहे की, आयआयएमआरने कोविड-19 नोव्हेंबरच्या मध्यभागी उच्च शिखरावर जाईल असा दावा केला असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत. पण या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. अहवालात नमूद केलेला अभ्यास आयसीएमआरने केला नाही.