India Received $111.22 Billion Remittances in 2022: युनायटेड नेशन्स मायग्रेशन एजन्सी 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन' (IOM) ने म्हटले आहे की, 2022 मध्ये भारताला जगभरातून $ 111 बिलियन रेमिटन्स (Remittances) मिळाले आहेत, जे सर्वात जास्त आहे. यासह भारत 100 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारा पहिला देश ठरला आहे. हे पैसे स्थलांतरितांनी भारतातील त्यांचे कुटुंब, नातेवाईक आणि मित्रांना हस्तांतरित केले आहेत. रेमिटन्स म्हणजे बाहेरील देशांमधून पेमेंट किंवा भेट म्हणून पाठवलेले पैसे.
आयओएमने आपल्या जागतिक स्थलांतर अहवाल 2024 मध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये भारत, मेक्सिको, चीन, फिलीपिन्स आणि फ्रान्स यांचा समावेश आहे, यामध्ये भारत अव्वल स्थानावर राहिला आणि त्याला 111.22 अब्ज डॉलरची रक्कम मिळाली. 2022 मध्ये मेक्सिको हा दुसरा सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश होता. 2021 मध्ये चीनला हरवून त्यांचे हे स्थान मिळवले.
पाकिस्तान आणि बांगलादेश हे 2022 मध्ये अनुक्रमे $30 अब्ज आणि $21.5 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारे सहावे आणि आठवे देश होते. याआधी भारताला 2010 मध्ये $53.48 अब्ज, 2015 मध्ये $68.91 अब्ज आणि 2020 मध्ये $83.15 अब्ज प्राप्त झाले. जगातील सर्वात जास्त स्थलांतरित लोक देखील भारतीय वंशाचे आहेत, ज्यांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1.3 टक्के किंवा 18 दशलक्ष आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की, 2020 मध्ये साथीच्या रोगामुळे आंतरराष्ट्रीय रेमिटन्समध्ये घट झाली आहे. स्थलांतरितांनी 2022 मध्ये जागतिक स्तरावर अंदाजे $831 अब्ज आंतरराष्ट्रीय रेमिटन्स पाठवले, जे 2021 मध्ये $791 अब्ज आणि 2020 मध्ये $717 अब्ज होते.