भारतात Coronavirus चा चौथा बळी; पंजाब येथे 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, जर्मनीहून इटलीमार्गे आला होता भारतात
Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) भारतात (India) चौथा तर पंजाबमध्ये (Punjab) पहिला मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी जर्मनीहून इटलीमार्गे परत आलेल्या 72 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीच्या नमुन्याची चाचणी कोरोना व्हायरससाठी सकारात्मक आल्याची पुष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. या व्यक्तीस मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्याही समस्या होत्या. बुधवारी बंगा सामुदायिक आरोग्य केंद्रात निधन झाल्यावर, त्याची चाचणी घेण्यात आल्याची माहिती पीजीआयएमईआर संचालक जगत राम यांनी दिली.

अद्याप आरोग्य अधिकाऱ्यांनी या मृत्यूच्या नेमक्या कारणाची पुष्टी केली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही अजून तरी कोणतेही पुष्टीकरण झाले नाही. जिल्हा सिव्हिल सर्जन राजिंदर प्रसाद भाटिया यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फक्त ही व्यक्ती जर्मनीहून इटलीमार्गे 7 मार्चला भारतात आल्याचे सांगितले. ही व्यक्ती बंगा येथील रहिवासी आहे. बुधवारी छातीत तीव्र वेदना होत असल्याने ते आरोग्य केंद्रात आले आणि तिथेच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या या मृत्यूमुळे सध्या संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. (हेही वाचा: Coronavirus: IndiGo कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात तर CEO सुद्धा घेणार 25 टक्के कमी पगार)

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव पाहता पंजाब सरकारने सरकारी आणि खासगी बसगाड्यांच्या परिचालनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मंत्र्यांच्या गटाच्या बैठकीत पुढील आदेश येईपर्यंत सर्व सरकारी व खासगी बसचे परिचालन 12 वाजेपासून थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये टेम्पो यंत्रणा देखील बंद केली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशाच्या विविध भागांतून 18 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर, गुरुवारी कोरोना विषाणूची एकूण संख्या 169 वर पोहोचली.