Supreme Court

इंडियाज गॉट लेटेंटमध्ये पालकांबद्दल अश्लील विनोद केल्यापासून युट्यूबर रणवीर अलाहाबादिया (Ranveer Allahbadia) अडचणीत आला आहे. त्याच्याविरुद्ध मोठी टीका होत असून, वेगवेगळ्या राज्यात गुन्हे दाखल आहेत. हे एफआयआर रद्द करण्यासाठी, युट्यूबरने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. मंगळवारी याबाबत न्यायालयात सुनावणी झाली. आता रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काही अटींसह त्याच्या अटकेवर बंदी घातली आहे. याशिवाय, रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट देखील जमा केला जाईल आणि सध्या त्याला शो करण्यापासून रोखण्यात आले आहे. सुनावणीदरम्यान, इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये पाहुणा म्हणून उपस्थित राहिलेला युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.

सर्वोच्च न्यायालयाने युट्यूबरला त्याच्या अश्लील कमेंट्सबद्दल फटकारले. न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले की, त्याचे मन घाणेरडे आहे. अशा व्यक्तीची केस आपण का ऐकावी? लोकप्रिय असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही गोष्टीवर भाष्य करू शकता. तुम्ही लोकांच्या पालकांचा अपमान करत आहात. तुमच्या मनात काही घाण आहे असे दिसते. ज्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन केले गेले, त्याबद्दल संपूर्ण समाजाला लाज वाटेल. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कडक टिप्पणी केली आणि म्हणाले, 'तुम्ही कोणत्याही प्रकारचे शब्द बोलू शकता आणि संपूर्ण समाजाला हलक्यात घेऊ शकता?.' जगातल्या कोणत्या व्यक्तीला असे शब्द आवडतील ते तुम्हीच सांगा. जर तुम्ही अपशब्द वापरून स्वस्त लोकप्रियता मिळवू शकत असाल, तर तुम्हाला धमकी देणाऱ्या व्यक्तीलाही प्रसिद्धी हवी आहे.’

India Got Latent Controversy:

सुप्रीम कोर्टाने या संदर्भात यूट्यूबरवर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की समाजाची काही मूल्ये आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या वकिलाला सांगितले की, 'तुम्ही वापरलेले शब्द बहिणी-मुलींना, आई-वडिलांना आणि समाजालाही लाजवतील असे आहेत. ही अश्लीलता नाही तर काय आहे? आम्ही तुमच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर का रद्द करू?’. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलाला विचारले, ‘तुम्ही अशा विधानांचा बचाव करत आहात का? आम्हाला जाणून घ्यायचे आहे की अश्लीलतेचे मापदंड काय आहेत? जर ही अश्लीलता नाही तर काय आहे? तुम्ही कोणती भाषा वापरत आहात ते तपासा. तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल बोलण्याचा परवाना आहे का?’ (हेही वाचा: India’s Got Latent Case: इंडियाज गॉट लेटेंट शोच्या सर्व सदस्यांविरुद्ध FIR दाखल)

त्यानंतर या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारींमध्ये पोलीस आणि तपास यंत्रणांना सहकार्य करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला दिले. तसेच आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी आता रणवीर अलाहाबादियाविरुद्ध नवीन एफआयआर दाखल केला जाणार नाही, असेही सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने रणवीरचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याला इंडियाज गॉट टॅलेंट हा शो करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाने रणवीरला आदेश दिला आहे की, तो परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाही.