India-China Border Tensions: दिल्ली येथील हॉटेल, गेस्टहाऊसमध्ये चीनी नागरिकांना थारा नाही- डीएचआरओए
Hotel Room | (Photo Credits: PixaBay)

लद्दाख प्रदेशातील गलवान खोऱ्यात चीनने काढलेल्या कुरापतींमुळे भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही लाट भारतातील उद्योग आणि व्यवसायिकांध्येही पाहायला मिळते आहे. त्यातूनच दिल्ली येथील हॉटेल व्यवसायिकांनी निर्णय घेतला आहे की, यापुढे आपल्या हॉटेलमध्ये चीनी नागरिकांना निवासासाठी जागा दिली जाणार नाही. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation of All India Traders) म्हणजेच कॅट (CAIT) ने काही दिवसांपूर्वीच अवानह केले होते की, भारतीय व्यवसायिकांनी चीन वस्तू खरेदी करु नयेत तसेच विकूही नयेत. कॅटप्रमाणेच आता दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशन (DHROA) द्वारा हा निर्णय घेतल्याचे दिसते.

दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, चीनचे घाणेरडे वर्तन पाहता आम्ही निर्णय घेतला आहे. एका आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये आजघडीला सुमारे 3000 पेक्षाही अधिक हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेस आहेत. या सर्व हॉटेल, गेस्टहाऊस यांच्यात असलेल्या एकूण खोल्यांची संख्या जवळपास 75,000 हजारांच्या आसपास आहे. (हेही वाचा, India-China clash: CAIT कडून चीनी मालावर बहिष्कार)

दिल्ली हॉटल अॅण्ड गेस्ट हाउस ओनर्स एसोसिएशन प्रमुख महेंद्र गुप्ता यांनी सांगितले की, चीन भारतासोबत ज्या पद्धतीने व्यवहार करतो आहे ते अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की, आमच्या हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसेसमध्ये चीनी नागरिकांना रहायला जागा दिली जाणार नाही. चीनी नागरिकांसाठी आमच्याकडील खोल्यांचे दरवाजे बंद असतील. चीनी वस्तू वापरातून हद्दपार करण्याची एक मोहीम देशभरात सुरु आहे. त्याच मोहिमेत आम्हीही सहभागी होत असून आम्ही चीनी नागरिकांना जागा देणार नाही.