पुढील आर्थिक वर्षात वर्षाकाठी पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार पाच ते दहा लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मंडळींच्या आयकरात (Income Tax) कपात करण्याचा विचार करीत आहे. यासाठी लवकरच एक प्रस्ताव सादर केला जाणार आहे. प्रत्यक्ष करांवरील टास्क फोर्सच्या (टीएफडीटी) शिफारशींवर सरकार विचार करीत आहे. या करानुसार सध्याच्या टॅक्स स्लॅबमध्ये असलेल्या प्रतिवर्षी 5 ते 10 लाखांच्या उत्पन्नावर दहा टक्के कपात करण्याचा प्रस्ताव आहे.
सीएनबीसी-टीव्ही 18 ने दिलेल्या अहवालानुसार, टीएफडीटीने केंद्र सरकारला अनेक शिफारसी केल्या आहेत. टीएफडीटीने शिफारस केलेल्या मुख्य प्रस्तावामध्ये वर्षाकाठी 5 ते 20 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्या लोकांसाठी आयकर कमी करण्याच्या प्रस्तावाचा समावेश आहे. याबाबत टीएफडीटीने वार्षिक पाच ते दहा लाख रुपयांच्या स्लॅबमध्ये आयकर दहा टक्क्यांनी कमी करण्याचा विचार केला आहे. यामध्ये वर्षाकाठी 10-20 लाख रुपयांच्या आयटी स्लॅबसाठी देखील शिफारस केली गेली आहे. (हेही वाचा: आजपासून आयकर विभाग कार्यालयाकडून नवा नियम; टॅक्सचोरी करून पळवाट शोधणार्यांना बसणार चाप)
केंद्रीय मंत्रालयाने या शिफारशी मान्य केल्यास वर्षाकाठी 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळविणार्या करदात्यांना फक्त 10 टक्के कर भरावा लागेल. दरवर्षी 10-20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा्यांना 20 टक्के आयटी द्यावी लागेल. सध्या आयकर दर हा वर्षाकाठी 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी 20 टक्के आणि 10 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी 30 टक्के इतका आहे. मात्र आयकर कमी करण्याबाबत सध्यातरी केंद्र सरकार आणि आयकर विभाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.