आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार (Congress Rajya Sabha MP)  धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घरातून जप्त झालेल्या रोख रकमेची मोजणी रविवारपर्यंत संपवण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत. जप्त केलेल्या नोटांची मोजणी लवकर करण्यासाठी रविवारी अतिरिक्त कॅश-काउंटिंग मशीन आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक भगत बेहरा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, त्यांना तब्बल 176 बॅग रोकड मिळाल्या आणि त्यातील 140 मोजल्या गेल्या आहेत. मोजणी प्रक्रियेत तीन बँकांचे पन्नास अधिकारी सहभागी असून 40 मशिन तैनात करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Chhattisgarh New CM: भाजपचे आदिवासी नेते Vishnu Deo Sai यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी निवड)

बेहरा म्हणाले की अधिकारी रविवारच्या अखेरीस मोजणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत कारण सोमवारपासून सामान्य बँकिंग तास सुरू होतील आणि मशीन देखील बँकांमध्ये परत कराव्या लागतील. कर अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तेवर विभागाच्या छाप्यांमध्ये जप्त करण्यात आलेली रोख रक्कम 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे एका एजन्सीने एका कारवाईत ही "सर्वात जास्त" पकडली आहे.