Heat wave. Representational Image. (Photo Credits: Pixabay)

उत्तर भारतातील बर्‍याच भागात तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर,  आता हवामान खात्याने (IMD) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानसाठी पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट' जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या 2-3 दिवसांत तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. आयएमडीचे प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पाहता, आयएमडीने या भागात 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. ते पुढे म्हणाले की, येत्या 2-3 दिवसांत काही भागातील तापमान 47 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते.

उन्हाळ्याच्या हंगामात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, हीटवेव्हसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी राजस्थानमधील पिलानी येथे 46.7 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवले गेले. दिल्ली एनसीआरसह मैदानी राज्यांमध्ये येत्या काही दिवसात तापमान जास्त राहील. वायव्य भारतातील उष्णतेच्या वेगामुळे येत्या तीन आणि चार दिवसांत या भागांमधील शहरांत तीव्र उष्णता येण्याची शक्यता आहे. सोमवार म्हणजे आजचे तापमान 45 अंशांपर्यंत जाऊ शकते. 23 मे हा या हंगामातील सर्वात उष्ण दिवस होता आणि या दिवशी तापमान 46 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले होते, जे सामान्य तापमानापेक्षा सुमारे 6 डिग्री सेल्सियस जास्त आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की, उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र उष्णता वाढत आहे व ही गोष्ट अशीच काही दिवस राहणार आहे. आयएमडीमते, वेस्‍टर्न डिस्‍टर्बेंस चा परिणाम 28 मेच्या रात्रीपासून दिसून येईल. यानंतर, जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो व त्यामुळे तापमान कमी होऊ शकते आणि पारा 38-39 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. हवामान खात्याने सांगितले की, दिल्ली-एनसीआरमध्ये 29-30 मे रोजी प्रति तास 60 किमी वेगाने धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. आयएमडीने सांगितले आहे की, या आठवड्यात उत्तर भारतासह महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये तापमानात वाढ होऊ शकते. महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे विदर्भातील तापमान वाढू शकते. (हेही वाचा: मुंबईत जून च्या दुसऱ्या आठवड्यात 'या' दिवशी मान्सून दाखल होणार; हवामान खात्याचा अंदाज)

दरम्यान, महाराष्ट्रातील विदर्भातील अकोला शहरात आजचे सर्वाधिक तापमान 47.4 डिग्री सेल्सियस इतके नोंदविण्यात आले, तर नागपूर येथे आज कमाल तापमान 47 डिग्री सेल्सियस नोंदवले गेले.