तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad) एक वृद्ध रुग्णासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी एक 89 वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली होती. ही व्यक्ती काही कामानिमित्त बँकेत गेली होती, त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीय चिंतेत पडले होते. कुटुंबीयांनी बरीच शोधाशोध केली, मात्र कोणताही सुगावा लागला नाही. अखेर त्यांनी याबाबत पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी मंगळवारी या वृद्ध व्यक्तीला शोधून काढले. बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या वृद्ध व्यक्तीला बँकेच्या लॉकर रूममध्ये (Bank Locker Room) रात्र काढावी लागली होती.
ही धक्कादायक घटना हैदराबादमधील पॉश एरिया ज्युबली हिल्स भागातील युनियन बँक ऑफ इंडियामधीलची आहे. ज्युबली हिल्स रोड क्रमांक 67 मध्ये राहणारे व्ही कृष्णा रेड्डी हे सोमवारी 28 मार्च रोजी दुपारी 4.20 च्या सुमारास काही कामानिमित्त बँकेत गेले होते. त्यांनी बँकेचे लॉकर उघडले होते. ते लॉकर रूममध्ये असतानाच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेला कुलूप लावले. आतमध्ये रेड्डी असल्याचे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले नाही किंवा बँक बंद करताना याची तपासणीदेखील केली नाही. (हेही वाचा: PPF to PAN-Aadhaar Linking: 31 मार्चपूर्वी पूर्ण करा 'ही' 8 काम; अन्यथा होऊ शकत मोठ नुकसान)
रात्री उशिरापर्यंत कृष्णा रेड्डी घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र हाती काहीच माहिती न लागल्याने त्यांनी जुबली हिल्स पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ज्युबली हिल्स चेकपोस्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि कृष्णा रेड्डी हे बँकेत गेले असल्याचे आढळून आले. पुढे तपासणी केली असता, कृष्णा रेड्डी लॉकर रूममध्ये सापडले. त्यानंतर ताबडतोब अल्झायमरने त्रस्त कृष्णा रेड्डी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ज्युबली हिल्सच्या एसएचओने ट्विट करून माहिती दिली. सध्या कृष्णा रेड्डी यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजत आहे.