Food Poisoning in Hyderabad: हैदराबादमध्ये निकृष्ट दर्जाच्या अन्न पदार्थांची पोलखोल समोर आली आहे. रंगा रेड्डी (Ranga Reddy) जिल्ह्यात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन मित्रंनी बिर्याणी आणि ग्रील्ड चिकन ऑनलाईन मागवली होती. ती खाल्ल्यानंतर तीन मित्र आजारी पडले. त्या तिघांना एकाच वेळी उलट्या, जुलाब आणि मळमळ होऊ लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जेथे डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचे सांगितले.
अरोमा रेस्टॉरंट आणि ॲपवर कारवाई करण्याची मागणी करत मित्रांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. त्यांनी सांगितले की त्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळाले. ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडले. तिघांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी अरोमा रेस्टॉरंटमधून ऑनलाइन ॲपद्वारे जेवण ऑर्डर केले होते. सध्या पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.
हैदराबादमध्ये अन्नातून विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात अशाच एका घटनेत, बंजारा हिल्सच्या नंदी नगरमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याकडून मोमोज खाल्ल्याने एका 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रेश्मा असे पीडित महिलेचे नाव. त्याच घटनेत मोमो खाल्ल्याणे 50 हून अधिक लोक आजारी पडले होते.