बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) पहिल्यांदाच देशातील अब्जाधीशांच्या यादीत आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. भारतीय मनोरंजन उद्योगाचा बादशाह शाहरुख खानचे नाव 7300 कोटींच्या संपत्तीसह प्रथमच हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 (Hurun India Rich List) मध्ये समाविष्ट झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील हिस्सेदारीमुळे किंग खान या यादीत आपले स्थान बनवू शकला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन, जुही चावला आणि फॅमिली, करण जोहर आणि हृतिक रोशन यांचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे.
हुरुन इंडियाच्या मते, जगातील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मिती उद्योगातून या वेळी श्रीमंतांच्या यादीत सामील झालेले लोक केवळ अभिनयाद्वारेच राज्य करत नाहीत, तर स्वत:चे प्रॉडक्शन हाऊसही चालवतात. शारुख खान हा रेड चिलीज एंटरटेनमेंटचा संस्थापक आहे. त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने अनेक मोठे आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे.
हुरुन इंडियाने सांगितले की, आयपीएल क्रिकेट टीम कोलकाता नाईट रायडर्समुळे शाहरुख खानच्या संपत्तीतही वाढ झाली आहे, जी एक यशस्वी फ्रेंचाइजी आहे. हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले, क्रिकेट आणि चित्रपट हे भारतातील लोक लोकप्रिय बाबी आहेत. मनोरंजन उद्योगातील सात लोकांनी, पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांनी एका वर्षात 40,500 कोटी रुपयांची संपत्ती जोडली आहे.
बंदरे, विमानतळ, सिमेंट आणि हरित ऊर्जा क्षेत्रात काम करणारे अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आता आशिया आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार, 31 जुलै 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी यांची संपत्ती 11.6 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. या यादीत मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. त्यांची संपत्ती 10.14 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर आणि कुटुंब 3.14 लाख कोटींच्या संपत्तीसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
सीरम इन्स्टिट्यूट या लस निर्मिती कंपनीचे मालक एस. पूनावाला या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी पाचव्या स्थानावर आहेत. गेल्या 5 वर्षांत भारतातील टॉप-10 अब्जाधीशांमध्ये 6 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत कुमार मंगलम बिर्ला कुटुंब सहाव्या स्थानावर, गोपीचंद हिंदुजा सातव्या स्थानावर, राधाकृष्ण दमानी आठव्या स्थानावर, अझीम प्रेमजी नवव्या स्थानावर आणि नीरज बजाज कुटुंब दहाव्या स्थानावर आहे. (हेही वाचा; Asia’s Richest Village: गुजरातमधील 'माधापर' ठरले आशियातील सर्वात श्रीमंत गाव; लोकांकडे आहेत 7000 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, जाणून घ्या कारण)
दरम्यान, हुरुन इंडियाच्या यादीत म्हटले आहे की, 31 जुलै 2024 पर्यंत या वर्षी भारताने दर 5 दिवसांनी एक अब्जाधीश निर्माण केला आहे. आशियातील संपत्ती निर्मितीच्या बाबतीत भारत वेगाने पुढे येत आहे, तर चीनमध्ये घसरण होत आहे. भारतात 2024 पर्यंत संपत्ती निर्मितीत 29 टक्के वाढ झाली आहे, तर देशातील अब्जाधीशांची संख्या 334 वर पोहोचली आहे.