पश्चिम बंगालमधील (West Bengal) हावडा (Howrah) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी एका महिलेने तिच्या पतीला 10 लाख रुपयांना किडनी विकण्यास भाग पाडले आणि नंतर संपूर्ण रोकड घेऊन प्रियकरासह पळून गेली. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. संक्राळ येथे राहणाऱ्या पतीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार, ही महिला गेल्या एक वर्षापासून पतीवर किडनी विकून घर चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी दबाव आणत होती. यासाठी ती आपल्या 12 वर्षांच्या मुलीच्या शिक्षणाचेही कारण देत होती.
अखेर पती तिच्या दबावाला बळी पडला व किडनी विकण्यास तयार झाला. त्यानंतर पत्नीने एका किडनी खरेदीदाराशी 10 लाख रुपयांनां करार केला. पत्नीवर विश्वास ठेवून पतीने किडनी दान करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. गेल्या महिन्यात शस्त्रक्रियेनंतर पतीने पैसे घरी आणले. यानंतर त्याच्या पत्नीने त्याला विश्रांती घेण्यास आणि लवकर बरे होण्यासाठी घराबाहेर न पडण्यास सांगितले.
पतीने पुढे सांगितले की, त्यानंतर एके दिवशी पत्नी घराबाहेर पडली आणि परत आलीच नाही. नंतर समजले की कपाटातून 10 लाख रुपयांच्या रोख रकमेसह इतर काही वस्तू गायब होत्या. नंतर कुटुंबाने अखेर त्यांच्या ओळखीच्या लोकांच्या मदतीने हावडापासून खूप दूर असलेल्या कोलकात्याच्या उत्तरेकडील उपनगर बराकपूरमध्ये त्याची पत्नी राहत असलेल्या घराचा शोध घेतला. या ठिकाणी पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती. फिर्यादीनुसार, ही महिला तिच्या प्रियकराला फेसबुकवर भेटली होती. मागील एक वर्षापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. (हेही वाचा: Ahmedabad Shocker: महिलेने घटस्फोट मागितल्यावर पतीचे घृणास्पद कृत्य, सोशल मिडियावर पोस्ट केले खाजगी व्हिडिओ आणि फोटो; तक्रार दाखल)
घराचा शोध लागल्यानंतर जेव्हा तिचा पती, सासू आणि मुलगी बराकपूरमधील व्यक्तीच्या घरी पोहोचले तेव्हा तिने परत येण्यास नकार दिला. महिलेच्या प्रियकराने, तिच्या पतीला व त्याच्या कुटुंबाला सांगितले की, ती (महिला) तिच्या विवाहित जीवनाच्या 16 वर्षांच्या कालावधीत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत तिच्या सासरच्यांविरुद्ध घटस्फोटाचा खटला दाखल करणार आहे. पत्रकारांशी बोलताना, कथित प्रियकराने महिलेने रोख रक्कम चोरल्याचा रोप फेटाळून लावला. आता तक्रारीनंतर कोणतीही कारवाई करण्यापूर्वी महिला आणि तिच्या कथित प्रियकराची चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.