PUBG (Photo Credit: File Photo)

भारतात पबजी (PUBG) गेमवर बंदी आहे. असे असूनही अनेक मुले हा खेळ खेळत आहेत. लखनऊमध्ये, आईने आपल्या 16 वर्षांच्या मुलाला पबजी खेळण्यापासून रोखले असता मुलाने तिची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने या घटनेची दाखल घेतली आहे. त्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. पत्रात एनसीपीसीआरच्या वतीने प्रश्न विचारण्यात आला आहे की, ‘पबजी सारख्या गेमवर भारतात बंदी आहे त्यानंतरही हा खेळ खेळण्यासाठी कसा काय उपलब्ध आहे?’

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश साहनी यांना हे पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये नमूद केले आहे की, ‘एका अल्पवयीन मुलाने त्याच्या आईला तिने पबजी खेळण्यापासून रोखल्यानंतर ठार मारले आहे. ही गोष्ट आयोगाच्या आकलनापलीकडची आहे. भारतात प्रतिबंधित असलेले खेळ अजूनही अल्पवयीन मुलांच्या वापरासाठी कसे काय उपलब्ध आहेत?’

आयोगाला अशा घटनांबाबत केलेल्या कारवाईची माहिती द्यावी आणि अल्पवयीन मुलांकडून खेळल्या जाणाऱ्या खेळांची यादी दहा दिवसांत द्यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. पबजी मोबाईलवर 2020 मध्ये बंदी घालण्यात आली होती. या गेमच्या चिनी कनेक्शनमुळे या गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर अनेक यूजर्सनी व्हिपीएन (VPN) च्या मदतीने भारतात पबजी खेळायला सुरुवात केली. गेमची लोकप्रियता पाहून कंपनीने गेल्या वर्षी आपला भारतीय अवतार BGMI लॉन्च केला. (हेही वाचा: वडिलांनी PUBG खेळण्यास नकार दिल्याने मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या)

दरम्यान, लखनौच्या यमुनापुरम कॉलनीत गेल्या शनिवारी रात्री साधना सिंह नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी दुसरा कोणी नसून तिचाच मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. आईने मुलाला पबजी खेळण्यापासून रोखल्याने मुलाने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.