Himachal Pradesh Samosa Scam: सध्या भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये समोस्यांची चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर समोसा कॉकस बळकट झाला असून, भारताअंतर्गत हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) समोसा घोटाळा (Samosa Scam) झाला असून त्यामुळे राज्यातील सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. समोसा प्रकरणानंतर या प्रकरणाचा तपास चक्क सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. आता तपास अहवालही आला असून त्यात मुख्यमंत्र्यांसाठी समोसा आणि केक मागवण्यात आला होता मात्र तो कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे समोर आले आहे.
अहवालानुसार, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू 21 ऑक्टोबरला सीआयडी मुख्यालयात पोहोचले होते. इथे त्यांच्यासाठी तीन बॉक्समध्ये समोसे आणि केक मागवले होते. पण झाले असे की, हे खाद्यपदार्थ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी सुरक्षा कर्मचाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांसाठी आणलेले समोसे आणि केक मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले, यात कोणाची चूक होती याचा तपास सीआयडीने केला आहे. तपास अहवालावर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लिहिले – ‘हे कृत्य 'सरकार आणि सीआयडीविरोधी' आहे.’ 21 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी सीआयडी मुख्यालयात गेले होते. चुकून मुख्यमंत्र्यांऐवजी मुख्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांना समोसे आणि केक देण्यात आला. (हेही वाचा: Shocking: पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले; चव वाढवण्यासाठी टॉयलेट क्लीनर हार्पिक आणि युरियाचा वापर, दुकानदारांना अटक)
तपास अहवालात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी चहा आणि पानाची व्यवस्था करण्याची जबाबदारी एमटीओ आणि एचएएसआयवर सोपवण्यात आली होती. मात्र केक आणि सामोसे मुख्यमंत्र्यांना दिल्या जाणार आहेत, याची कल्पना नसल्याने एका महिला अधिकाऱ्याने या खाद्यपदार्थांचे बॉक्स न उघडता एमटी विभागाकडे सुपूर्द केले. त्यानंतर आयजीच्या खोलीत बसलेल्या 10-12 लोकांना चहासोबत बॉक्समध्ये ठेवलेल्या या वस्तू देण्यात आल्या. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख माध्यम सल्लागार सुखविंदर सिंग सुखू नरेश चौहान यांनी हे संपूर्ण प्रकरण खोटी प्रसिद्धी असल्याचे म्हटले आहे. सरकारने असा कोणताही तपास करण्याचे आदेश दिलेले नाहीत. नरेश चौहान म्हणाले की, या प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही. सीआयडी विभाग आपल्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करत आहे.