Himachal Pradesh Phone Blast: हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) मोबाईल स्फोटामुळे (Phone Blast) एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. डलहौसी, चंबा येथे ही घटना घडली. मोबाईल फोनच्या स्फोटामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. किरण असे मृताचे नाव असून ती बिचुनी गावची रहिवासी होती. किरणने चार्जिंगला लावलेला फोन वापरायला सुरुवात केल्यावर ही घटना घडली. चार्जिंगला असलेला फोन घेऊन मी मोबाईल इंटरनेट चालू करताच मोठा स्फोट झाला.
स्फोटाच्या वेळी किरणच्या कानाजवळ मोबाईल फोन होता. मयताच्या आईला स्फोटाचा आवाज ऐकू येताच ती धावत तिच्या खोलीत गेली. त्यावेळी किरण गंभीर जखमी झाल्याचे दिसले. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी किरणला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, तेथून तिला चंबा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले.
5 दिवस चाललेल्या उपचारानंतर किरणचा मृत्यू-
पुढे जखमांची गंभीरता लक्षात घेऊन किरणला कांगडा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले, तेथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले. सुमारे 5 दिवस चाललेल्या उपचारानंतरही किरणला वाचवता आले नाही आणि 15 डिसेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर किरणचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. मोबाईल स्फोटानंतर जखमी तरुणी जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याने, मोबाईलचा स्फोट कसा झाला आणि काय झाले याबाबत संपूर्ण प्रकरण उघड होऊ शकले नाही. (हेही वाचा: Mobile Blast in Pocket At Gondia: खिशात मोबाईलचा स्फोट; गोंदिया येथील शिक्षकाचा मृत्यू, एक जखमी)
अशी घ्या खबरदारी-
- फोन चार्ज होत असताना कधीही वापरू नका.
- आवश्यकता नसल्यास फोनला जास्त काळ चार्जिंगवर ठेऊ नका.
- चार्जिंग झाल्यावर ताबडतोब फोन चार्जिंगवरून काढून टाका.
- फोन चार्जिंगवर असताना शक्यतो तो वापरणे टाळा.
- फोन चार्ज करण्यासाठी नेहमी चांगल्या दर्जाचा चार्जर वापरा. स्वस्त चार्जरमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.