कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे गरीब जनतेचं कंबरडं मोडेल अशी भीती अनेक अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. आता त्याची प्रचिती अनेकांना समाजामध्ये येत आहे. लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षणपद्धती राबवली जात आहे. हालाखीच्या परिस्थितीमध्ये असणार्या हिमाचल मधील कुलदीप कुमार (Kuldip Kumar) या व्यक्तीवर आपल्या मुलांना स्मार्टफोन विकत घेऊन देण्यासाठी अर्थाजनाचं केवळ साधन असणार्या गायीला विकण्याची वेळ आली आहे. त्यांनी सहा हजार रूपयांना गाईला विकून दोन मुलांसाठी स्मार्टफोन विकत घेतला.
कुलदीप कुमार हे हिमाचल मध्ये ज्वालामुखी येथे गुमर गावामध्ये राहतात. तेथे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे. यामध्ये शाळादेखीलबंद आहेत. आता शिक्षण ऑनलाईन झाल्याने त्यांच्यावर मुलांना स्मार्टफोन विकत घेण्याचा दबाव वाढला. त्यांची दोन मुलं दीपू आणि अन्नू हे दुसरी आणि चौथीमध्ये शिकत आहेत.
दैनिक ट्रिब्युन च्या रिपोर्ट नुसार, स्मार्टफोन घेण्यासाठी खाजगी सावकार, बॅंकांमध्ये त्यांनू कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आर्थिक स्थिती कमजोर असल्याने त्यांना कर्ज नाकारण्यात आलं. मुलांचे शिक्षण कायम ठेवण्यासाठी त्यांना पैशांची जुळवाजुळव करणं भाग होते. सारे मार्ग संपले तेव्हा त्यांनी गाय विकून 6000 रूपये उभे केले आणि स्मार्टफोन विकत घेतला.
कुलदीप एका मातीच्या घरात राहतो. ना त्याच्याकडे बीपीएल कार्ड ना IRDP चा तो लाभार्थी आहे. दरम्यान अंत्योदय योजना, IRDP ,BPL साठी नावनोंदणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सारेच लालफितीमध्ये अडकून पडले आहे.