Delhi Police (Photo Credits: IANS)

दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यतेनंतर राजधानी दिल्लीमध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ला होऊ शकतो. ज्यानंतर दिल्लीमध्ये हाय सिक्योरिटी अलर्ट (High alert in Delhi) जारी करण्यात आला आहे. अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश पोलीसांना दहशतवादी संघटना तहरीक एक तालिबानकडून एक धमकीचा ईमेल प्राप्त झाला होता. जो उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्ली पोलिसांना पाठवला आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सरोजनी नगर मार्केट येथे गस्त वाढवला आहे.

अनेक वृत्तवाहिन्यांनाही अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत. दिल्ली पोलिसांची एक विशेष टीम या ईमेलची सत्यता आणि हा ईमेल कोणी पाठवला याची चौकशी करत आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या हद्दीत येणाऱ्या भागांत आणि शहरांमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आल आहे. उल्लेखनीय असे की, 2008 मध्येही अशाच प्रकारचे ईमेल आल्यानंतर दिल्लीमध्ये हशतवादी हल्ले झाले होते.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी, सर्व प्रकारच्या सेवा, बाजारपेठा सुरु आहेत. आवश्यक तेथे पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनाही काही संशयास्पद आढळले तर पोलिसांना कळविण्याचे अवाहन करण्यात आले आहे. पोलीस ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.