'हेमा मालिनी झाली म्हातारी त्यामुळे 'कतरिना कैफ'च्या गालासारखे गुळगुळीत रस्ते तयार झाले पाहिजेत'; मंत्री Rajendra Singh Gudha यांचे वादग्रस्त विधान
Rajasthan Minister Rajendra Gudha. (Photo Credits: Facebook)

2005 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना 'बिहारचे रस्ते हेमा मालिनींच्या (Hema Malini) गालासारखे गुळगुळीत होतील' असे विधान केले होते. त्या विधानावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता लालूंच्या एक पाऊल पुढे जाऊन राजस्थानचे सैनिक कल्याण राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा (Rajendra Singh Gudha) यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. झुंझुनू येथे झालेल्या एका जाहीर सभेत राजस्थान सरकारचे मंत्री म्हणाले की, ‘हेमा मालिनी आता म्हाताऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे रस्ते कतरिना कैफच्या गालासारखे गुळगुळीत तयार व्हायला पाहिजेत.’

मंगळवारी, झुंझुनूच्या पौंख गावात, पीडब्ल्यूडीचे एसई एनके जोशी रस्त्यांची माहिती देत ​​होते. याच दरम्यान मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी एसई यांच्याकडून माईक घेतला आणि चांगले रस्ते बनवा असे सांगितले. ते म्हणाले की हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते बनवले पाहिजेत. पण नंतर त्यांनी हेमा मालिनी आता म्हातारी झाल्याचे सांगितले. त्यानंतर सध्या कोणती अभिनेत्री चर्चेत आहे असा सवाल उपस्थितांना केला. लोकांनी कतरिना कैफचे नाव घेतले. यानंतर गुढा म्हणाले की, ‘रस्ते कतरिना कैफच्या गालासारखे गुळगुळीत बनवले पाहिजेत.’ यानंतर घटनास्थळी एकच हशा पिकला.

गेहलोत सरकारच्या रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात बसपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले राजेंद्र सिंह गुढा यांना राज्यमंत्री करण्यात आले आहे. आता गुढा यांच्या वक्तव्यावर सोशल मिडियावर टीका होत आहे. (हेही वाचा: Farm Laws Repeal: कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी)

दरम्यान, 2005 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी बिहारच्या रस्त्यांबाबत बोलताना येथील रस्ते हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत होतील असे म्हटले होते. यानंतर 2013 मध्ये यूपीचे तत्कालीन मंत्री राजाराम पांडे यांनीही रस्त्यांची तुलना हेमा मालिनी यांच्या गालासोबत केली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये मध्य प्रदेशचे तत्कालीन मंत्री पीसी शर्मा यांनीही हेमा मालिनी यांच्या गालासारखे रस्ते बनतील असे सांगितले होते. पुढे नोव्हेंबर 2019 मध्ये छत्तीसगडचे तत्कालीन मंत्री कावासी लखमा यांनीही हेमा मालिनी यांच्या गालाप्रमाणे रस्ते बांधण्याबाबत वक्तव्य केले होते.