Delivery Partner (Photo Credit : Pixabay)

Heatwave In India: अजूनही भारतातील मोठा भाग प्रचंड उष्णतेच्या (Heat) तडाख्यात असून, अनेक शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. अशा परिस्थितीत, अन्न वितरण कंपन्या (Food Delivery Companies) आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म (E-Commerce Platforms) त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एकवटल्या आहेत. घरोघरी सामान पोहोचवणाऱ्या वितरण भागीदारांना कडक उन्हापासून वाचवण्यासाठी झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्या अनेक उपाय करत आहेत.

ऑनलाइन ऑर्डरद्वारे खाद्यपदार्थ वितरीत करणाऱ्या झोमॅटोने, आपल्या वितरण कर्मचाऱ्यांसाठी देशभरात 450 विश्रांतीची ठिकाणे तयार केली आहेत. कोणत्याही कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी आराम करू शकतात.

विश्रांतीच्या आसनव्यवस्थासह इथे मोफत पाणी, मोबाईल चार्जिंग पॉइंट आणि स्वच्छ स्वच्छतागृहाची सोय करण्यात आली आहे. कंपनीने 250 हून अधिक शहरांमध्ये 450 हून अधिक ठिकाणी विश्रांती केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, रस आणि ग्लुकोज इ.ची व्यवस्था केली आहे. झोमॅटोचे सीईओ राकेश रंजन म्हणाले की, कोणत्याही आरोग्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी 530 हून अधिक शहरांमधील सर्व वितरण भागीदारांना रुग्णवाहिका सेवा 15 मिनिटांत उपलब्ध करून दिली जाते.

झोमॅटोने आपल्या ग्राहकांना दुपारच्या पीक अवर्समध्ये अगदी आवश्यक असल्यास ऑर्डर देण्याचे आवाहन केले आहे. स्विगीच्या इन्स्टंट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टने जास्त मागणी असलेल्या भागात 900 हून अधिक रिचार्ज झोन तयार केले आहेत. यामध्ये विश्रांतीची जागा, पाणी, मोबाईल फोन चार्जिंग पॉइंट आणि सर्व डिलिव्हरी भागीदारांसाठी शौचालये उपलब्ध आहेत. (हेही वाचा: Mumbai Rain Update: मान्सून पूर्व पावसाची हजेरी, दादर आणि लगतच्या भागात मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज)

ब्लिंकिटने वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत त्वरित मदत देण्यासाठी वितरण भागीदारांसाठी ॲपमध्ये सहयोग फिचर जोडले आहे. ब्लिंकिटचे सीईओ अल्बिंदर धिंडसा म्हणाले की, उष्णतेपासून तात्काळ आराम मिळावा यासाठी कंपनी आपल्या स्टोअरच्या वेटिंग एरियामध्ये एअर कूलर बसवत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट देखील आपल्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी उपाय करत आहे. ग्लुकोज शीतपेयांचे वितरण, सर्व सुविधांमध्ये अतिरिक्त पंखे आणि कूलरची तरतूद केली जात आहे.