बीएमसी सह महाराष्ट्रात होणार्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांबाबत असलेल्या प्रश्नचिन्हावर आज उत्तर मिळण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज याप्रकरणी न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. या निवडणूका पूर्वीच्या सरकार ने घेतलेल्या प्रभाग संख्येप्रमाणे होणार की नव्या सरकारच्या संख्येनुसार यावर या सुनावणीमध्ये निर्णय अपेक्षित आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2021 साली कोरोना संकटामुळे जनगणना न झाल्याने लोकसंख्या वाढ लक्षात घेता महानगरपालिकांसोबत अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग संख्या वाढवली होती. राज्य निवडणूक आयोगानेही ती अंतिम केली. राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडील प्रभाग रचनेचाही अधिकार काढून स्वतःकडे घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये मुंबई महापालिकेत प्रभागसंख्या २२७ वरून २३६ झाली होती. पण शिंदे सरकारने ती पुन्हा पूर्वीप्रमाणेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रिम कोर्टात या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे. निवडणूकांबाबत कोर्टाने 5 आठवडे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. सध्या अनेक महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला आहे.