Shocking! फोन चार्जिंगला लावून पत्नीशी बोलत होता; विजेचा धक्का लागून झाला मृत्यू
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

स्मार्टफोन (Smartphone) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. देशातील खेड्या-पाड्यापर्यंत स्मार्टफोनची क्रेझ पोहोचली आहे. परंतु अनेकदा या फोनबाबत दुर्घटनादेखील घडल्या आहेत. अनेकदा लोक चार्जिंग (Charging) करताना फोन वापरतात. तुम्हीदेखील मोबाईल चार्जवर ठेवून बोलत असाल तर सावध व्हा, कारण यामुळे काही अघटीत घडू शकते. इंदूरमध्ये (Indore) नुकतीच अशी एक घटना घडली असून त्यात एका तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. या तरुण मोबाईल चार्जिंगला लावून पत्नीशी बोलत असताना ही घटना घडली.

इंदूरमधील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात सुजित विश्वकर्मा या 25 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मोबाईल चार्जिंगला लावून तो पत्नीशी बोलत होता, त्यावेळी त्याला जोरदार करंट लागला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे. सुतारकाम करत असलेला सुजित दोन दिवसांपूर्वीच यूपीहून कामासाठी इंदूरला आला होता. (हेही वाचा: सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईल फोनचा वापर आणि व्हिडिओ बनवणे म्हणजे गंभीर गैरवर्तन, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय)

सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुजित हा मोबाईल चार्जिंगवर पत्नीशी बोलत असताना सुजितच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचा भाऊ धावत आला, त्यावेळी त्याला दिसले की, सुजित जमिनीवर पडलेला होता. सुजितला त्याच गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे काही काळ उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला. सुजीतचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, लोक फोन चार्जिंगवर लावून त्याचा वापर करतात, पण ही चुकीची सवय आहे. चार्जिंग दरम्यान फोन न वापरल्याने तो लवकर चार्ज होतो आणि जर तुम्ही तो वापरत राहिलात तर चार्जिंगला वेळ लागतो, जे फोनच्या बॅटरीसाठी हानिकारक आहे, तसेच मोबाईलचा स्फोट होण्याचीही भीती असते. तसेच फोन चार्ज करण्यासाठी कंपनीचाच चार्जर वापरा.